डिंभे : निवडणुका आल्या, की ते दर वेळी मनापासून मतदान करतात. गाव उंच डोंगरावर व मतदान केंद्र डोंगराच्या पायाथ्याशी. दर वेळी मतदानासाठी सकाळी डोंगर उतरायचा व मतदान केले, की डोंगर चढून संध्याकाळपर्यंत घरी पोहोचायचे. अशीच किती तरी वर्षे सरली. हाताच्या बोटाला लावलेली शाई दाखवून-दाखवून त्यांच्या पिढ्यान् पिढ्या सरल्या; मात्र अजूनही खेतेपठार व आपटी येथील आदिवासींच्या पदरी कसलेही दान पडले नाही. गावाला रस्ता व पाण्याची सोय व्हावी एवढी माफक मागणी येथील जनतेची आहे; मात्र अजून त्यांची ही मागणी मायबाप सरकारच्या गळी उतरली नाही.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील उंच डोंगरावर वसलेली आपटी व खेतेपठार ही दोन आदिवासी लोकसंख्या असलेली गावे. या दोन्ही गावांत जवळपास अडीचशेच्या आसपास मतदान आहे. मात्र, या गावांत केवळ दळणवळणाच्या अडचणीपायी मतदान केंद्र नाही. या गावांतील मतदारांसाठी डोंगरपायथ्याशी असणाऱ्या गाडेकरवाडी येथे मतदान केंद्र आहे. दर वेळी निवडणूक आली, की मतदानासाठी येथील आदिवासींना ५ ते ६ किलोमीटरचा डोंगर उतरून मतदानासाठी खाली यावे लागते. दिवसा उन्हाचा त्रास जास्त होत असल्याने दर वेळेस येथील महिला व ज्येष्ठ मतदार सकाळीच मतदानासाठी गाडेकरवाडी येथे येत असतात व दुपारनंतर ऊन कमी झाल्यावर डोंगर चढून घरी जातात. निवडणुका आल्या, की पिढ्यान् पिढ्या आम्ही मतदान करीत आलो आहे. मात्र, आमचे गाऱ्हाणे अजून तरी मायबाप सरकारच्या गळी उतरले नाही. आमच्या गावाला रस्ता नसल्याने दैनंदिन कामासाठी दर वेळी आम्हाला या डोंगरावरून चढउतार करावा लागत आहे. आपटीचा रस्ता मंजूर झाला आहे. मात्र, प्रत्यक्षात या रस्त्याला सुरुवात झाली नसल्याने अजून तरी किती दिवस गावकऱ्यांना या डोंगराशी टकरा घ्याव्या लागतात. आजही खेतेपठार व आपटी येथून अनेक महिला गाडेकरवाडी येथे असणाऱ्या मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्या होत्या. तसेच पुरुषही आले होते. मतदान झाल्यावर एका निवांत क्षणी उन्हे उतरायची वाट पाहत या महिला एका झाडाच्या सावलीत बसल्या होत्या. मतदानाच्या दिवशीच घडतो उपास मतदान केंद्रापासून गाव लांब असल्याने मतदानाच्या दिवशी दिवसभर मतदानासाठी आलेल्या महिला उपाशीपोटीच असतात. आज गाडेकरवाडी येथे मतदानासाठी आपटी व खतेपठार येथून आलेल्या महिलांशी संवाद साधला असता, घरे वर डोंगरावर आसल्याने मतदानाच्या दिवशी दर वेळीच उपास घडत असल्याचे त्यांनी सांगितले. नुसतीच आश्वासने... आता जीव थकला हीच अवस्था खेतेपठारची येथील आदिवासीही उन्हाळा, हिवाळा व पावसाळ्यात डोंगराची चढउतार करून थकले आहेत. निवडणुका आल्या, की ‘तुमच्या गावाला रस्ता मंजूर करू, पाण्याची सोय करू’ अशी आश्वासने दिली जातात; मात्र मतदान झाले, की पुढील ५ वर्षे आमच्या अडचणींकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे खेतेपठार येथील महिलांनी सांगितले.
शाई दाखवून पिढ्या सरल्या.. पदरी मात्र काहीच नाही
By admin | Published: February 22, 2017 2:23 AM