पुणे - शहरातील चांदणी चौकात असलेल्या एक छोट्या झुडपात आढळून आलेल्या चिमुकलीला अखेर तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कौटुंबिक वादातूनच या गोंडस चिमुकलीला झुडपात टाकून तिच्या आईने पळ काढल्याची प्राथमिक माहिती आहे. वाहतूक पोलिसांच्या संवेदनशीलतेनं आणि कोथरुडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांच्या सुपरफास्ट यंत्रणेनं या मुलीच्या काकांचा शोध घेत तिला त्यांच्याकडे देण्यात आले. त्यामुळे, वाहतूक पोलिसांसह संपूर्ण कोथरुड पोलिसांना अत्यानंद झाला.
पुण्याच्या चांदणी चौक परिसरातील झुडपात गुरुवारी सायकांळी सव्वासहा वाजता लहान बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून काही नागरिक तेथे गेले. त्यावेळी, साधारण 4 ते 5 महिन्यांचे बाळ कुणीतरी टाकून गेल्याचे निदर्शनास आले. अंगावर कपडे परिधान केलेलं, डोक्यावर टकुचं घातलेली, गालाला काजळ लावेलली अन् गोड हसऱ्या चेहऱ्याची ही गोंडस चिमुकली रडताना पाहून अनेकांच्या काळजाचं पाणी झालं. त्यामुळे नागरिकांनी तात्काळ जवळच ड्युटी करत असलेल्या वारजे वाहतूक पोलीस सुजय पवार आणि सुरेश शिंदेंना यासंदर्भात माहिती दिली. रिमझिम पावसात भिजत, पोलिसांनी या चिमुकलीला हळुवार आपल्या कुशीत घेतले. काही मिनिटांतच सोशल मीडियावर या गोंडस बाळाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. सोशल मीडियावरुनही मोठ्या प्रमाणात संवेदना व काळजी व्यक्त करण्यात येऊ लागली.
चिमुकलीला ताब्यात घेणाऱ्या वाहतूक पोलिसांनी आजुबाजूला शोध घेऊन कुणीही न आढळल्याने बाळाला कोथरूड पोलिसांचा ताब्यात दिले. लॉकडाउनमुळे निर्मनुष्य झालेल्या झुडपातील हे बाळ कदाचित भटक्या कुत्राच्या सावज होण्याची शक्यता होती. सुदैवाने, नागरिक आणि वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे ते बाळ सुरक्षित हाती पोहोचले. त्यानंतर, या बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेण्याचं काम पोलिसांनी सुरु केलं. कोथरूडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी मायेच्या वात्सल्यपूर्ण भावनेतून तपास यंत्रणा गतीमान केली. संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याचे आदेशही देण्यात आले. पोलिसांच्या या वेगवान तपासामुळे काही तासांतच मुलीच्या काकांचा शोध लागला. त्यानंतर, काकांकडे विचारपूस करुन प्रतिभा जोशी यांनी त्या चिमुकलीला काकांच्या स्वाधीन केले. त्यानंतरच, कोथरुड पोलिसांचा जीव भांड्यात पडला.
दरम्यान, पोलिसांनी चिमुकलीच्या काकांच्या मदतीने तिच्या वडिलांचा शोध घेतला असून तिच्या आईचा अद्याप शोध सुरू आहे. कौटुंबिक वादातूनच मुलीच्या आईने हे कृत्य केले असावे असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, वाहतूक पोलिसांच्या व कोथरुड पोलिसांच्या खाकी वर्दीतल्या संवदेनशीलतेमुळे काही तासांतच बाळ सुखरुप हाती पोहोचले. चिमुलीच्या नातेवाईकांचा शोध लागल्याचा सर्वाधिक आनंद आम्हा पोलीस बांधवाना झाल्याचं प्रतिभा जोशी यांनी म्हटलं.