भारतात पुणे, दिल्ली, हैद्राबाद आणि बंगळुरू या चार प्रमुख शहरांमध्ये जिनोम सर्व्हेलन्स करण्यात येत आहे. कोरोना विषाणूच्या जनुकीय संरचनेमध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहेत. जिनोम सिक्वेन्सिंगमुळे विषाणू कुठे आणि किती प्रमाणात पसरला आहे, याचा अभ्यास करता येतो. सध्या अस्तित्वात असलेला डेल्टा (बी 1.617.2) व्हेरियंट झपाट्याने संसर्ग पसरवत आहे. त्यामध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटची भर पडली आहे. जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये विषाणूतील जेनेटिक मटेरियलचा अभ्यास केला जातो. यामध्ये विषाणूची ताकद किती वाढली, विषाणू किती गंभीर स्वरूपाचा आहे, त्यापासून संसर्गाचा धोका किती पटीने जास्त आहे हे सर्व कयास बांधता येऊ शकतात, अशी माहिती विषाणूजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. हेमंत पंडित यांनी दिली.
जीनोम सिक्वेन्सिंगच्या सर्वेक्षणाला गती मिळण्यासाठी काऊन्सिल आॅफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या इन्स्टिट्यूट आॅफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटेड बायोलॉजी या प्रयोगशाळेसोबत करार करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यभरात सर्वेक्षण केले जात आहे. सध्या रुग्णसंख्या कमी असली तरी त्यातील बहुतांश रुग्णांना डेल्टा विषाणूची लागण झाली आहे. डेल्टा प्लसच्या संसर्गाचे प्रमाण सध्या कमी आहे. सध्या पुणे जिल्ह्यामध्ये डेल्डा प्लस विषाणूची लागण झालेले ६ रुग्ण आहेत. विभागीय पातळीवर रॅपिड रिस्पॉन्स टीम, रुग्णाच्या प्रवासाचा, लसीकरणाचा इतिहास, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग यावर भर दिला जात आहे. सध्याच्या परिस्थितीतही नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक वर्तनाचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
-------------------
डेल्टा आणि डेल्टा प्लसमधील जनुकीय रचना समजून घेण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंगला प्राधान्य दिले जात आहे. सध्या डेल्टा प्लसचे कमी रुग्ण आढळून येत आहेत. त्या तुलनेत डेल्टाची लागण होण्याचे प्रमाण जास्त आहे.
- डॉ. प्रदीप आवटे, आरोग्य सर्वेक्षण अधिकारी