पुणे :पुणे शहराचा भूगोल अतिशय वेगळा आहे. कारण भौगोलिकदृष्ट्या पुणे महत्त्वाचे शहर आहे. इथे चहूबाजूने डोंगररांगा असून, मध्येच बशीसारख्या खोलगट भागात शहर वसलेले आहे. इथले वातावरणही सर्वांना मानवणारे असल्याने मोठमोठे अधिकारी निवृत्त झाले की, पुण्यात स्थायिक होत आहेत. १४ जानेवारी हा भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त पुण्याची भौगोलिक माहिती घेऊ या.
पुणे हे महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागात मुंबईच्या पूर्वेला रस्त्याने १५० ते १६० किलोमीटर अंतरावर आहे. पुणे शहराची समुद्र-सपाटीपासूनची उंची अथवा जमीन पातळी ५६० मीटर ते ६६० मीटरदरम्यान आहे. पुणे रेल्वे स्टेशनजवळ ही उंची ५६९ मीटर (१८५० फूट) आहे.
पुण्याभोवती पश्चिम दिशेला टेकड्या व दक्षिण दिशेला डोंगर आहेत. पुण्याच्या दक्षिणेला कात्रजपाशी मोठमोठ्या टेकड्यांची रांग आहे. या टेकड्यांतून कात्रजचा बोगदा खोदलेला आहे. तेथून पुढे सातारा-कोल्हापूरमार्गे दक्षिण भारतामध्ये जाता येते. कात्रजच्या टेकडीजवळ एका छोट्या टेकडीवर जैन धर्मीयांनी उत्कृष्ट जैन मंदिर १९९६ साली बांधलेले आहे. त्याला वर्धमान आगम जैन मंदिर असे म्हणतात. त्यापुढे आपण गेल्यावर पर्वतीची टेकडी व देवस्थान हे पुणे शहराचे आवडते ठिकाण आहे. तेथेही तळजाईपर्यंत टेकड्या आहेत. त्यापुढे पश्चिमेला गेल्यावर आपणाला लांबवर सिंहगड किल्ला दिसतो. त्याची उंची ४३२९ फूट आहे. त्यापुढे पश्चिमेला आपल्याला पश्चिम घाट प्रदेश दिसून येतो. येथे मोठे डोंगर, दऱ्या आणि खोरी आहेत. येथे पावसाचे प्रमाण खूप आहे. या प्रदेशामधूनच मुठा नदी उगम पावते आणि त्यावर प्रथम खडकवासला आणि नंतर पानशेत व वरसगाव ही धरणे बांधली आहेत. ही धरणे म्हणजे पुण्याची जीवनदायिनी क्षेत्रे होत.
यापुढे गेल्यानंतर आपणाला डोंगरांच्या अनेक रांगा दिसतात, याला मुळशीचे खोरे असे म्हणतात. या खोऱ्यामध्ये मुळा नदीचा उगम झालेला आहे. या नदीवर प्रसिद्ध उद्योगपती टाटा यांनी धरण बांधलेले आहे. या परिसरात भरपूर पाऊस पडतो. आणि हा सर्व प्रदेश चारी बाजूने उंच डोंगर व दऱ्यांनी वेढलेला दिसतो. (माहितीचा स्रोत : पुणे शहराचा ज्ञानकोश, डॉ. शां. ग. महाजन)
पश्चिमेला पुणे शहराच्या अंतर्भागामध्ये चतु:श्रृंगी ही टेकड्यांची मालिका लागते. त्यामुळे सिम्बाॅयसिसजवळ हनुमान आणि वेताळ टेकड्या आहेत. एका तऱ्हेने पुण्याभोवती डोंगर, टेकड्यांनी रिंगणच घातलेले आहे. पुण्याच्या उत्तरेला मात्र फार थोड्या टेकड्या सापडतात. हा रस्ता अहमदनगरला जातो. पुणे-सोलापूर रस्त्यावरसुद्धा कमी टेकड्या आहेत. पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ १५,६४२ चौरस किमी आहे. ते महाराष्ट्र राज्याच्या ५.०९ टक्के इतके आहे.
पुणे जिल्ह्याचा आकार सामान्यत: त्रिकोणाकृती बुटाच्या आकाराचा आहे. पश्चिमेकडील सह्याद्री पर्वती हा त्याचा पाया तर आग्नेय कोपऱ्यातील भीमा व नीरा या नद्यांच्या संगमाजवळ याचा शिरोबिंदू येतो.
पुणे जिल्ह्यातील नद्या : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात लहान-मोठ्या नद्या वाहतात. बहुतेक सर्व नद्या पश्चिमेकडील सह्याद्री पर्वतात उगम पावून पूर्व किंवा आग्नेय दिशेने वाहतात. भीमा, मीना, कुकडी, वेल, घोड, पुष्पावती, इंद्रायणी, मुळा, मुठा, पवना, नीरा या प्रमुख नद्या आहेत.
अक्षांश रेखांश :
पुणे शहर १० - ३१ उत्तर या अक्षवृत्तावर आणि ७३ - ५१ पूर्व या रेखावृत्तावर पृथ्वीच्या नकाशावर आहे.
...म्हणून भूगोल दिन साजरा
देशाच्या पातळीवरील भूगोल विषय-तज्ज्ञ प्रा. चं. धुं. ऊर्फ सी. डी. देशपांडे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार १९८६ मध्ये पुणे येथे पं. भीमसेन जोशी यांच्या हस्ते करण्यात आला होता. मीच तो सोहळा आयोजिला होता. त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी डॉ. देशपांडे यांचा जन्मदिन महाराष्ट्रभर ‘भूगोल दिन’ म्हणून सुरू झाला. मकर संक्रांतीला मुलांना शाळेत तीळगूळ वाटला जातो. ऋतुबदल होण्याचा हा दिवस भूगोलासाठी महत्त्वाचा आहे. म्हणून याच दिवशी ‘भूगोल दिन’ साजरा केला जातो.
- डॉ. सुरेश गरसोळे, महाराष्ट्र भूगोल समिती