पुणे : कौटुंबीक समस्यांतून एका जर्मन नागरिकाने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हा जर्मन नागरिक भारतात आल्यापासून हरवला असल्याची तसेच तो आत्महत्या करणार असल्याची माहिती जर्मन दुतावासाने दिली होती. सीबीआयने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला त्याचा शोध घेण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. सीआयडीकडून मिळालेल्या सूचनांनतर पुणे पोलिसांनी शहरात त्याचा शोध घेतला असता तो कोरेगाव पार्क भागात राहात असल्याची माहिती उपलब्ध झाली. मात्र, तोपर्यंत उशीर झालेला होता. मायकेल पॉल कोसीकोवस्की (वय ३०, रा. जर्मनी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मायकेल पॉल हा १३ फेब्रुवारी रोजी जर्मनीहून विमानाने मुंबईमध्ये आला होता. त्यानंतर तो काही दिवस गोव्यात राहीला. भारतात आल्यानंतर त्याचा कुटुंबीयांशी कोणताही संपर्क झालेला नव्हता. त्यामुळे त्याची आई बेट कोसीकोवस्की यांनी जर्मन शासनाकडे त्याचा भारतात शोध घेण्यासंदर्भात विनंती केली होती. जर्मन दुतावासाकडून भारत सरकारला यासंदर्भात माहिती देण्यात आली. सीबीआयने मायकेलचे जीपीएसद्वारे शेवटचे लोकेशन शोधले असता ते पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील नॉर्थ मेन रोड गल्ली क्रमांक २ असे आले. सीबीआयने ही माहिती सीआयडीला कळवत त्याचा शोध घेण्यासंदर्भात सूचना दिल्या. मायकेल गोव्याहून ३ मार्च रोजी पुण्यामध्ये आला होता. तो कोरेगाव पार्क भागातील राजविलास सोसायटीमध्ये पेर्इंग गेस्ट म्हणून राहात होता. साधारणपणे ५ मार्चनंतर तो खोलीच्या बाहेरच आला नाही. तो दार उघडत नसल्यामुळे केअरटेकरने कोरेगाव पार्क पोलिसांना माहिती कळवली. पोलिसांना तो अत्यवस्थ आढळून आला. त्याच्याजवळ झोपेच्या गोळ्यांची डबी पडलेली होती. त्याला बुधराणी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केले. कोमामध्ये असलेल्या मायकेलचा उपचारादरम्यान २६ मार्च रोजी मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांनी भारतातच त्याचा अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील स्नेहालय संस्थेने त्यांना मदत केली. वैकुंठ स्मशानभूमीमध्ये मायकेलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कौटुंबिक कारणावरून नैराश्यमायकेल हा जर्मनीतील प्रसिद्ध व्यक्ती होता. बॉडी बिल्डर असलेला मायकेल कौटुंबीक कारणावरून नैराश्यामध्ये गेला होता. त्याने घेतलेल्या आत्महत्येच्या निर्णयामुळे आईला मोठा धक्का बसला आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये त्याच्या कुटुंबीयांना जर्मनीच्या सामाजिक कार्यकर्त्या उल्ली हिलगर आणि जनवाणीचे संजय आढाव यांची खूप मदत झाली.मायकेल सापडल्याची माहिती जर्मन दुतावासाला कळवण्यात आली. १४ मार्च रोजी त्याची आई बेट कोसीकोवस्की, मैत्रीण लुईसा हाल्फमॅन आणि मित्र पॅट्रीक टिलीयन पुण्यात आले. हे सर्वजण उल्ली हिलगर या भारतात सामाजिक काम करणाऱ्या महिलेच्या संपर्कात आले. हिलगर यांनी जनवाणी आणि स्नेहालय संस्थेचे काम करणाऱ्या संजय आढाव यांना ही माहिती दिली. आढाव हे आठवडाभर त्यांच्यासोबत होते.
जर्मन तरुणाची आत्महत्या
By admin | Published: March 31, 2017 3:29 AM