पुणे : नुकतेच दहावी व बारावीचे निकाल लागले आहेत. शहरात कला, विज्ञान, वाणिज्य शाखेचे प्रवेश सुरू झाले आहेत. स्वयंअर्थसहाय्य असलेल्या महाविद्यालयांत प्रवेश घ्यायचा आणि थेट परीक्षेलाच कॉलेजमध्ये जायचे, असा फंडा या महाविद्यालयांमध्ये वापरला जात आहे. विशेषकरून विज्ञान शाखेत हे हाेताना दिसून येत आहे.
बारावीनंतर अनेक विद्यार्थी हे मेडिकलला जायचे असल्यास बारावीची परीक्षा नावालाच देतात. त्यापेक्षा त्यांचा कल हा नीट किंवा इंजिनिअरिंगला जायचे असल्यास जेईई परीक्षा देण्याकडे असताे. म्हणून केवळ नावाला ही परीक्षा द्यायची. काॅलेज बंद करायचे असा एक ट्रेंड पडल्याचे दिसून येत आहे. म्हणून या महाविद्यालयांत उपस्थितीचे बंधन व सायन्सच्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन प्रवेश हे नावालाच असतात.
उपस्थिती अनिवार्यता नावालाच
परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी नियमानुसार विद्यार्थ्यांची महाविद्यालयात ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. नोकरी, व्यवसाय अथवा खासगी संस्थेमध्ये कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या निमित्ताने विविध प्रवेश परीक्षांचा अभ्यास करत महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.
सायन्सचे विद्यार्थी थेट परीक्षेलाच महाविद्यालयात
विज्ञान शाखेचे विद्यार्थी थेट परीक्षेलाच येत असल्याचे दिसतात. खरे पाहता या विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात उपस्थित राहणे व प्रात्यक्षिक पूर्ण करणे आवश्यक असते; मात्र काही महाविद्यालयांकडून त्यांना सूट देण्यात येते.
आर्ट्स-कॉमर्सची उपस्थिती चांगली
अकरावी, बारावी असो की पदवीचे शिक्षण, त्यासाठी प्रवेश घ्यायचा अन् थेट परीक्षेलाच महाविद्यालयात जायचे, असा प्रकार विद्यार्थ्यांकडून वाढत असले तरी आर्ट्स व काॅमर्सच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती मात्र चांगली असते.
मला वैद्यकीय परीक्षेत प्रवेश घेण्यासाठी नीट परीक्षा द्यायची असल्याने मला नावापुरते विज्ञान विषयात १२ वी करायची आहे. त्यासाठी महाविद्यालयीन शिक्षणाकडे फारसे लक्ष देऊ शकत नाही; परंतु माझे भविष्य प्रवेश प्रक्रियेवर अवलंबून असल्याने त्याकडे लक्ष देणे गरजेचे असते.
- रवींद्र शिंदे, विद्यार्थी
विद्यार्थ्यांना आता महाविद्यालयांमध्ये उपस्थित राहावे लागते. परंतु पुढील शिक्षणाच्या दृष्टीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून काही महाविद्यालये त्यांना हजेरीबाबत सांभाळून घेतात; परंतु विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात उपस्थित रहावे असा नेहमीच आग्रह असतो. त्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय