किरण शिंदे
पुणे : भारतीय जनता पक्षाने अजित पवारांना (Ajit Pawar) सोबत घेतल्यामुळेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नुकसान झाले असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असणाऱ्या ऑर्गनायझर या मासिकातील एका लेखात प्रसिद्ध झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपला बहुमत असताना अजित पवार गटाला सोबत घेण्याची काय गरज होती? असा सवाल यातून विचारण्यात आला होता. महाराष्ट्रात काही गोष्टी टाळता आल्या असत्या. जसे की, भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले गेले. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला. या एका कारणामुळे भाजपाने आपली किंमत कमी करून घेतली," असे या लेखामध्ये म्हटले होते.
त्यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते देखील नाराज असल्याचे समोर येत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला आमदार राहुल कुल यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत सर्वांसमोर एका कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.
अजित पवारांनी भाजपच्या नेत्यांवर अन्याय केला. त्यामुळे कार्यकर्त्यांची मन जाणून घेत निर्णय घेणार असाल तर अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा. अजित पवारांनी सुभाष बाप्पू, योगेश दादा या तिघांवर अन्याय केला. हे तिघेही मंत्री झाले असते. अनेकांना महामंडळ मिळाले असते. अजितदादा असतील तर ही सत्ता आणि ही खुर्ची नको. ज्या राष्ट्रवादीचा आम्ही दहा वर्षापासून विरोध करतोय तीच राष्ट्रवादी आता सोबत घेतली आहे. विधानसभेला अजितदादा सोबत असतील आणि सत्ता मिळणार असेल तर ती सत्ता आपल्याला नकोय अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अजितदादांसाठी सत्ता आणायची का? असे म्हणत भाजपच्या बैठकीत या पदाधिकाऱ्याने आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.