पुणे : भ्रष्टाचार संपविण्यासाठी स्मार्ट सिटी आराखडा मंजूर होणे आवश्यक आहे. त्याकरिता राजकीय पक्षांनी त्यांचे मतभेद बाजूला ठेवून त्याला मान्यता द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केले. महापालिकेच्या मुख्यसभेने स्मार्ट सिटी आराखड्याला मंजुरी द्यावी याकरिता शास्त्रज्ञ डॉ. अभय जेरे यांच्या पुढाकारातून ‘सेव्ह स्मार्ट पुणे’ या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. त्याअंतर्गत सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठिंब्याची मोहीम उघडण्यात आली आहे. सोशल मीडियावर एक लाख लोकांपेक्षा जास्त लोकांनी स्मार्ट पुण्याला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर रविवारी शनिवारवाडा येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विक्रम गोखले, अभय जेरे, आबिदा इनामदार, शेखर मुंदडा, अनिल पटवर्धन उपस्थित होते.महापालिकेच्या मुख्यसभेत स्मार्ट सिटीचा आराखडा मंजूर करावा यासाठी सेव्ह स्मार्ट पुणे या संघटनेच्या वतीने या वेळी सह्यांची मोहीम राबविण्यात आली. दोन हजार पुणेकरांनी या वेळी स्मार्ट सिटीच्या पाठिंब्याकरिता सह्या केल्या. लोकहितासाठी स्मार्ट सिटी आराखडा मंजूर होणे आवश्यक आहे. त्याकरिता युवकांनी पुढाकार घ्यावा, असे विक्रम गोखले यांनी या वेळी सांगितले. डॉ. अभय जेरे म्हणाले, की स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पुण्याच्या विकासाला मोठी मदत होणार आहे. आराखडा बनविण्यात मी स्वत: सहभागी झालो होतो. शेवटच्या क्षणी त्याला नकार दिला जाऊ नये. शनवार वाड्यापासून महापालिकेवर मोर्चा काढून आयुक्त कुणाल कुमार यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
भ्रष्टाचार संपण्यासाठी मंजुरी मिळावी
By admin | Published: December 14, 2015 12:33 AM