दावडी : खेड तालुक्याच्या पूर्व भागात होणाऱ्या विमानतळाला सेझबाधित शेतकरी व स्वाभिमानी संघटनेचा विरोध नाही. विमानतळ व्हावा, या भागाचा विकास होईल, अशी भावना शेतकऱ्यांची आहे. मात्र, १५ टक्के परताव्याचा प्रश्न मार्गी लावूनच विमानतळ करावा, तरच शेतकरी कुठलाही विरोध करणार नाहीत, असे शेतकऱ्यांनी सांगितले.धामणटेक (ता. खेड) येथे विमानतळ होणाऱ्या जागेत सेझबाधित शेतकरी व स्वाभिमानी संघटना यांची सोमवारी (दि. २९) बैठक झाली. या वेळी दावडी, निमगाव, गोसासी, केंदूर, कनेरसर या परिसरातील शेतकरी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील विमानतळ राजगुरुनगरच्या पूर्व भागात ‘सेझ’जवळील जागेत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मागील आठवड्यात सांगितले. २००८मध्ये सेझ प्रकल्पासाठी १,२५० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. १५ टक्के परतावा शेतकऱ्यांनी देण्यात येईल, असे त्या वेळी जाहीर करण्यात आले होते. मात्र, अजून तो मिळालेला नाही. शेतकरी त्यासाठी आजही लढा देत आहेत. ८ ते १० वर्षे होऊनही फक्त जमीन संपादनाव्यतिरिक्त कोणतेही काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे लवकरात लवकर कोणता तरी प्रकल्प होऊ द्या, अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे. सेझबाधितांचा विचार कोण करतो? राष्ट्रविकासासाठी विमानतळ व्हावा, ही सर्व शेतकऱ्यांची भावना असून विमानतळाला आमचा विरोध नाही. आमचा विरोध फक्त १५ टक्के परतावा मिळवा यासाठी आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खेड तालुका पूर्व भागप्रमुख काशिनाथ दौंडकर, मारुती गोरडे, चंद्रकात भालेराव यांनी सांगितले आहे. या वेळी राहुल सातपुते, विष्णू दौंडकर, सुभाष बेल्हेकर, दशरथ शिंदे, मारुती सुक्रे, धाडीभाऊ साकोरे, पांडुरंग साकोरे, संतोष आरुडे, एकनाथ गोरडे, राम दौंडकर, नानाभाऊ गोरडे, अरुण दौंडकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
विमानतळाआधी १५ टक्के परताव्याचा प्रश्न मार्गी लावा
By admin | Published: August 31, 2016 1:21 AM