पुणे : होर्डिंग दुर्घटनेतील मृत व जखमी व्यक्तींचे नातेवाईक तसेच वाहनांचे झालेले नुकसान याबाबत संबंधितांना नुकसान भरपाई देण्याची ग्वाही रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यासाठी संबंधित सर्वांना प्रशासनाकडून सर्व सहकार्य केले जाईल, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. खासदार अनिल शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा पंचायत,आम आदमी पार्टी यांच्या प्रतिनिधींनी शनिवारी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांची भेट घेतली. यावेळी पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार, आपचे मुकुंद किर्दक, श्रीकांत आचार्य, आनंद अंकुश यांनी सहभाग घेतला. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील व अन्य अधिकारीही उपस्थित होते. रेल्वेच्या चुकीमुळे होर्डिंग दुर्घटना झाली असून त्यात चार जणांचा बळी गेला. तसेच काही जण जखणी झाले असून वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. रेल्वे अपघातग्रस्तांना प्राथमिक मदत देत आहे. मात्र मोटार अपघात नुकसान भरपाई कायद्यानुसार मृताच्या वारसांना व अपघाताने शारीरिक नुकसान झालेल्यांना भरपाई मिळावी, रेल्वे दावा प्राधिकरणामध्येही याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी संघटनांनी केली. कोणत्या प्रकारे नुकसान भरपाई दावे दाखल करायचे हे निश्चित झाल्यावर त्यानुसार प्रत्येक अपघातग्रस्ताचे दावे मागणी अर्ज भरून देण्यापासून सर्व ते सहकार्य रेल्वे करेल असे, देऊस्कर व पाटील म्हणाले. त्यानंतर पुणे पोलीस परिमंडळ २ चे उपायुक्त बच्चन सिंग यांचीही भेट घेण्यात आली. या अपघातात नोंदविलेल्या गुन्ह्यामध्ये मोटार अपघात विषयी कलमांचा अंतर्भाव करावा अशी मागणी करण्यात आली. -------------------