पुणे : कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी पुणे महापालिकेकडून पास घ्यावा लागतो. त्या पासशिवाय शहरातील स्मशानभुमींमध्ये मृतदेहाचे दहन करता येत नाही. आता ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात येणार असून दहनविधीसाठी लागणारा पास ऑनलाईन देण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रणाली (सॉफ्टवेअर) तयार करण्यात येत असून पालिकेच्या ‘पीएमसी कनेक्ट’ या मोबाईल अॅपवरही ही सुविधा देण्यात येणार आहे.
एखाद्या व्यक्तीचा अपघात, दुर्घटना, आजारपणामुळे तसेच नैसर्गिक अशा कोणत्याही प्रकारे मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी पालिकेकडून पास घेणे बंधनकारक आहे. हा पास पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांसह ससून रुग्णालयात मिळतो. मृत व्यक्तीच्या अंत्यविधीची तयारी सुरु असताना कुटुंबियांना याठिकाणी जाऊन पास काढून आणावा लागतो. त्यावर कोणत्या स्मशानभूमीमध्ये दहन करण्यात येणार याची नोंद करण्यात येते. मात्र, यामध्ये बराच वेळ जातो. त्यामुळे आता मृत्यूवार्ता ऑनलाईन देण्याची सुविधा निर्माण करण्यात येत आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर पालिकेच्या या ऑनलाईन प्रणालीमध्ये संबंधित डॉक्टरने दिलेला मृत्यू दाखला अथवा नगरसेवकाचे पत्र अपलोड करावे लागणार आहे. त्यामधील माहिती अचूक भरल्यानंतर काही वेळातच हा पास संबंधिताला उपलब्ध होणार आहे. त्याचा मेसेज मोबाईलवर देण्यात येणार आहे. तसेच ज्या स्मशानभूमीमध्ये दहन होईल तेथील कर्मचारी संबंधित पासचा क्रमांक टाकून विधी पूर्ण झाल्याची माहिती ऑनलाईन पद्धतीनेच पालिकेला देतील. पालिकेचे संबंधित विभागाचे डॉक्टर ही माहिती पडताळून एका दिवसात मृत्यू दाखल नातेवाईंना देतील. ही प्रक्रिया नागरिकांचा वेळ वाचविणारी असून त्यासाठी मृत्यू दाखला केंद्रात ऑनलाईन काम करण्यासाठी २४ तास १२ कर्मचारी नेमण्यात येणार आहेत.
जर एखाद्या रुग्णाचा उपचारांदरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला, तर त्याच्या मृत्यूची वार्ता रुग्णालयामधूनच ऑनलाईन भरण्याची आणि तेथेच पास उपलब्ध करुन देण्याचा पालिकेचा विचार सुरु आहे. यासंदर्भात खासगी रुग्णालयांशी बोलणी करण्यात येणार आहेत. यासोबतच शासकीय रुग्णालयांमध्येही ही सुविधा पुरविण्यात येणार आहे.
पुण्यातील सर्वात मोठ्या वैकुंठ स्मशानभुमीच्या कार्यालयामध्ये ‘डिजीटल स्क्रिन’ लावण्यात येणार आहे. या स्क्रिनवर कोणत्या शेडमध्ये कोणाचा अंत्यविधी सुरु आहे याची माहिती मिळू शकणार आहे. या स्क्रिनद्वारे स्मशानभूमीच्या परिसरामध्येही लक्ष ठेवण्यात येणार आहे.