घोडेगाव : माळीण दुर्घटनाग्रस्तांसाठी ४०० स्क्वेअर फुटांची घरे बांधण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यासाठी गरज भासल्यास चाकण एमआयडीसीतील मोठ्या कंपन्यांची बैठक घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन करावे, अशी भूमिका खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत मांडली. माळीण गावच्या पुनर्वसनाबाबत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांची भेट घेतली. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, आंबेगाव तालुक्यातील माळीण गावातील दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने बाधित ग्रामस्थांना २६९ स्क्वेअर फुटांची घरे देण्याचे नियोजन केले आहे. परंतु, दुर्घटनाग्रस्त नागरिकांची घरे बऱ्यापैकी मोठी होती. त्यामुळे त्यांना किमान ४०० स्क्वेअर फुटांची घरे बांधून द्यावीत, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. यासाठी अंदाजे पाच लाख रुपयांचा निधी लागणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगून इंदिरा आवास योजनेतून केवळ दीड लाख रुपयेच निधी उपलब्ध होतो, असे ते म्हणाले. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले की, आपण ४०० स्क्वेअर फुटांची घरे बांधावीत, त्यासाठी प्रत्येक घरामागे ५ लाख इतका खर्च अपेक्षित आहे. केंद्र शासनाने माळीण दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी देशातील खासदारांना आपला निधी देण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे विविध खासदार, काही कंपनी व्यवस्थानांच्या माध्यमातून व माझ्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून मी साधारणत: १४ ते १५ घरे बांधून देण्याची जबाबदारी घेण्यास तयार आहे. उर्वरित घरांसाठी चाकण परिसरातील कंपन्यांशी चर्चा करून त्यांच्या सीएसआर फंडातूनही निधीची मागणी करता येऊ शकेल. याकामी प्रशासनास सर्वोतपरी सहकार्य करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. त्याचप्रमाणे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या वेळी विविध विषयांवर चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे आवाहन केले. या वेळी बैठकीस शिवसेना आंबेगाव तालुकाप्रमुख रवींद्र करंजखेले, नगरसेवक धनंजय आल्हाट, उपजिल्हाप्रमुख अमोल हरपळे, शिवेसना पुणे उपशहरप्रमुख संदीप मोरे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
चारशे फुटांचे घर मिळावे
By admin | Published: November 20, 2014 4:32 AM