लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी परिश्रमाबरोबरच काटेकोर नियोजन, सकारात्मक दृष्टिकोन आणि अभ्यासातील सातत्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करीत असताना अपयश ही केवळ एक मानसिकता असून त्यातून बाहेर पडत यशस्वी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील (बार्टी) विविध योजनांद्वारे प्रायोजित केल्या गेलेल्या आणि यूपीएससी-२०१६ च्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा बुधवारी यशदा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी बडोले बोलत होते. सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे, सचिव दिनेश वाघमारे, बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे, यशदाचे महासंचालक आनंद लिमये, समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, प्रादेशिक पारपत्र अधिकारी अतुल गोतसुर्वे, आयकर उपायुक्त अजय ढोके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या वेळी स्नेहल लोखंडे, संतोष सुखदेवे, दशदिक्पाल नंदेश्वर, नितीन बगाटे, निखिल बोरकर, रूपेश शेवाळे, जयपाल देठे, अविनाश शिंदे, प्रज्ञा खंदारे, वैभव वाघमारे, अनिल भगुरे, राहुल जावीर, वैभव दहीवाले, धम्मपाल खंडागळे यांचा समावेश होता. राज्यात पहिली आलेली विश्वांजली गायकवाड, आदित्य रत्नपारखी, सारंग पोफळे, माधव वणवे या यशस्वी विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. राजेश ढाबरे यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या प्रकल्प संचालिका रूपाली आवळे यांनी आभार मानले.
अपयशी मानसिकतेतून बाहेर पडून यशस्वी व्हा!
By admin | Published: June 29, 2017 3:45 AM