पुणे : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची बैठक सुरू असतानाच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागा, असे आदेश पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिले. त्यात पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात कामाला लागण्याचे आदेश शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.
राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे उभी फूट पडली आहे. पक्षामध्ये दोन गट पडले असून, एक गट सत्तेमध्ये तर एक गट विरोधामध्ये आहे. अजित पवारांच्या बंडामुळे अनेक आमदार, जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये विभागणी झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये जे काही 70-80 जागा राष्ट्रवादीकडे येतील तिथे जोरदार तयारी करण्याच्या सूचना पक्षाध्यक्षांकडून देण्यात आल्या आहेत.
पुण्यातील हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे चेतन तुपे हे सध्या आमदार आहेत. मात्र प्रशांत जगताप यांना बैठकीमध्ये तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आहे. प्रशांत जगताप हे या आधी झालेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी देखील इच्छुक उमेदवार होते मात्र तेव्हा चेतन तुपे यांना संधी देण्यात आली. आता मात्र शरद पवार गटाकडून हडपसर विधानसभा मतदारसंघाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा जगताप यांनी व्यक्त केली असून, पक्षश्रेष्ठींनी तयारीचे आदेश दिले आहे.
प्रशांत जगताप म्हणाले की, “पक्षाने ४१ लोकांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे संबंधित मतदारसंघामध्ये पक्षाकडून उमेदवार दिले जाणार आहेत. त्यासंदर्भात उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. मी हडपसर मतदारसंघामध्ये निवडणूक लढविण्यास इच्छुक असून निवडणूक लढवणार आहे. 2019 मध्ये देखील मी इच्छुक होतो; पण संधी मिळाली नाही, मात्र यावेळेस हडपसर मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे.