लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : स्वातंत्र्यसंग्रामात प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्याला पारतंत्र्यातून मुक्त केले. पारतंत्र्यापासून मुक्ती मिळून स्वतंत्र्य आयुष्य जगू शकत असताना व्यसनांसारख्या पारतंत्र्यात अडकायला नको. म्हणूनच निर्धाराने या व्यसनांच्या जोखडातून मुक्तव्हा, असे आवाहन पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आज केले. जागतिक अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त मुक्तांगण मित्र आणि पुणे शहर पोलीस यांच्यातर्फे विविध कार्यक्रम घेतले जातात. या वेळी रश्मी शुक्ला यांची मुलाखत आणि मुक्तांगणमधील रुग्णांशी संवाद, अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुक्तांगणच्या विश्वस्त मुक्ता पुणतांबेकर, ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट, अतिरिक्त आयुक्त प्रदीप देशपांडे, खडकी विभागाचे सहायक पोलीस आयुक्तवसंत तांबे, नार्कोटिक्स विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, येरवडाचे विरिष्ठ निरीक्षक मुकुंद महाजन, नार्कोटिक्स विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. या वेळी काही रुग्णांनी व्यसनाधीन असताना आणि मुक्तांगणमुळे झालेल्या त्यांच्यातील सकारात्मक बदलाबाबत अनुभव कथन केले. या वेळी झालेल्या प्रश्नोत्तरांच्या तासात रुग्णांनी विचारलेल्या प्रश्नांना रश्मी शुक्ला यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. कोरेगाव पार्क परिसरात होत असलेल्या बेकायदेशीर गोष्टींबाबत स्वत: लक्ष घालू, असे आश्वासन दिले. मुक्ता पुणतांबेकर यांनी प्रास्ताविक केले. मुक्तांगणचे प्रमुख डॉ. अनिल अवचट यांनी संस्थेच्या स्थापनेमागची भूमिका विषद केली.
व्यसनांच्या जोखडातून मुक्त व्हा
By admin | Published: June 29, 2017 3:36 AM