--
कडूस : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा गेल्या दीड वर्षांपासून बंद असून, आत्ता काही ठिकाणी हळूहळू, किमान मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होत आहेत. मात्र शाळेमध्ये स्वच्छता आणि कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठीची कोणतीच यंत्रणा राबविण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाने याबाबत लक्ष द्यावे, अशी मागणी येथील विद्यार्थिनींनी केली.
सध्या शाळांमध्ये मुलींच्या संख्येनुसार शौचालये, मुबलक प्रमाणात पाणी, साबण, सॅनिटरी पॅड त्याची विल्हेवाट लावण्यासाठी डिस्पोजेबल मशीन अशा कोणत्याच सोयी उपलब्ध नसल्यामुळे शाळेत जाणे अजूनही धोक्याचे आहे.
या धर्तीवर वर्क फॉर इक्वॅलिटी संस्थेच्या माध्यमातून खेड तालुक्यातील हजार विद्यार्थिनी गेल्या वर्षभरापासून तालुका आणि जिल्हापातळीवर आपले गाऱ्हाणे मांडत आहे. त्यांनी २०१९ साली पाहणी केलेल्या अहवालानुसार खेड तालुक्यातील शाळांमध्ये शौचालये, पाणी, सॅनिटरी पॅड, डिस्पोजेबल मशीन अशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या काळात मुलींचे शाळेतील गैरहजर राहण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. त्यामुळे संस्थेच्या वतीने किशोरी मुलींची अशी मागणी आहे की १५ व्या वित्त आयोगातून शाळांना निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश सर्व ग्रामपंचायतीना तातडीने दिले जावे.
याबाबत पंचायत समितीमध्ये झालेल्या बैठकीत त्यावर निर्णय घेण्यात आला. त्या बैठकीला मिटींगमध्ये गर्ल्स लीडर प्रतिनिधी मानसी ढमाले, समृद्धी काळे, संजीवनी कांबळे आणि श्रद्धा तेलंगे यांनी मागण्यांचा मसुदा गट विकास अधिकाऱ्यांनी साजरा केला, ज्यामध्ये खेड तालुक्यातील ६०० मुलींनी सह्या करून मागण्यांची त्वरित पूर्तता होण्यासाठी १५ व्या वित्तआयोगातून निधी उपलब्ध करून द्यावा, असे लेखी आदेश ग्रामसेवकांना द्यावेत या आशयाची विनंती तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना केली आहे.
---
चौकट
खेड तालुक्यातील १३३ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वरीलप्रमाणे स्वच्छतेच्या सुविधा १५ व्या वित्त आयोगातून दिल्या जाव्यात या स्वरूपाचा ठराव १ वर्षांपूर्वी खेड पंचायत समितीमध्ये सभापती अंकुश राक्षे यांच्या अध्यक्षतेखाली पास करण्यात आला आहे. या ठरावाची अंमलबजावणी त्वरित व्हावी व त्या संदर्भात माहिती सर्व ग्रामसेवकांना मिळावी या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला खेड तालुक्यातील ५० पेक्षा जास्त ग्रामसेवक हजर होते. खेड तालुक्याचे गट विकास अधिकारी अजय जोशींनी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनची व्यवस्था CSR फंडातून करता येईल. त्यासाठी वेंडिंग मशीनमध्ये नियमित रिफिलिंग करण्यासाठी गावातून मुलींनी पुढाकार घेतल्यास हे काम लवकर होऊ शकते, असे आश्वासन दिले आहे. संस्थेच्या गर्ल्स लीडर्स यासाठी पुढाकार घेतील, अशी माहिती संस्थेच्या संस्थापिका प्रभा विलास यांनी दिली.
--
फोटो क्रमांक : ०८ कडूस कोरोनाशी लढा
फोटो ओळी : १५व्या वित्त आयोगातून मुलींच्या सुविधासाठी खर्च व्हावा.यासाठी प्रतिनिधी मुलींनी लेखी गाऱ्हाणे गटविकास अधिकाऱ्यांना दिले.