शिरूर : पाणीटंचाईच्या परिस्थितीतही प्रशासकीय अनास्थेचा फटका तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना बसत आहे. महिन्यापूर्वी पाठविलेल्या टँकरच्या ८ प्रस्तावांपैकी केवळ चारच गावांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, टँकर मंजूर होऊन चार दिवस उलटूनही टँकर सुरू करण्यात आले नसल्याचे चित्र आहे.तालुक्यातील पिंपळसुटी, शिरसगावकाटा, तर्डोबावाडी, मिडगुलवाडी, मलठण, न्हावरे-करडे व चव्हाणवाडी या गावांचे प्रस्ताव पंचायत समितीने एप्रिलच्या (२०१६) दुसऱ्या आठवड्यात तहसीलकडे पाठविले. तहसील कार्यालयाने मंजुरीसाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले. यांपैकी पिंपळसुटी, शिरसगावकाटा, तर्डोबावाडी व मिडगुलवाडी या गावांचेच टँकर मंजूर करण्यात आले. दीड महिन्याने या गावांचे टँकर मंजूर झाले. ३१ मे रोजी टँकर मंजूर झाले; मात्र एजन्सीकडे टँकरच उपलब्ध नसल्याने या मंजूर गावांना अद्याप टँकर पाठविण्यात आलेले नाहीत. मलठण, न्हावरे, करडे व चव्हाणवाडी या गावांचे टँकर मंजूर न झाल्याने तेथे पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.नव्याने कोंढापूर, तळेगाव ढमढेरे व केंदूर येथील टँकरचे प्रस्ताव मंजुरीसाठी पंचायत समितीकडे दाखल झाले आहेत. अद्याप हे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे आले नसल्याचे तहसीलच्या सूत्रांनी सांगितले. टंचाईच्या कालावधीतही प्रशासन वेगाने टँकर मंजुरीसाठी कार्यवाही करताना दिसत नाही. प्रस्ताव द्यायचा पंचायत समितीकडे व पंचायत समिती तो पाठविणार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या, प्रक्रियेतच बराच कालावधी जातो. तहसीलच्या स्तरावरच टँकर मंजुरीचे अधिकार असावेत, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. ज्या गांवाचे प्रस्ताव मंजूर झालेले नाहीत, त्यांनी प्रस्ताव दाखल करून दीड महिना उलटून गेला. आता काय पावसाळ्यात यांचे प्रस्ताव मंजूर होणार का, असा प्रश्न आहे.
प्रस्ताव देऊनही टँकर मिळेना
By admin | Published: June 04, 2016 12:30 AM