पुणे : स्वाइन फ्लू तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने दवाखाने आणि खासगी प्रॅक्टीसनर्स साठी जुनेच आदेश नव्याने काढले आहेत. यामध्ये संशयित स्वाइन फ्लू च्या रुग्नांची लक्षणांनुसार ए, बी, सी या तीन प्रकारामध्ये वर्गवारी करा व त्यापैकी बी व सी गटातील रुग्णांचीच तपासणी करण्याची शिफारस करा असे म्हटले आहे. सध्या स्वाइन फ्लूची रुग्णसंख्या वाढत आहे. याशिवाय सर्वसामान्य फ्लूची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत आहे. परंतु सर्वसामान्यपणे कोणत्याही लक्षणे असल्यास त्यासाठी "एच1एन1' ची तपासणी करण्याचा सल्ला देऊ नये असे यामध्ये म्हटले आहे.
अशी आहे वर्गवारी
ए वर्गवारी
- थोडा ताप, कफ, घसा खवखणे, अंग दुखी, डोके दुखी, जुलाब उलटी होत असतील तर प्रयोगशाळा तपासणी करण्याची गरज नाही. यासाठी रुग्णाचे घरीच विलगीकरण करणे, योग्य ती औषधे घेणे आणि 24 तास देखरेखीखाली ठेवणे हा उपाय यामध्ये सांगितला आहे.
बी वर्गवारी
- प्रमाणापेक्षा जास्त ताप, घशाला जास्त इन्फेक्शन आणि नाक गळत असेल तर त्यांची स्वॅब टेस्ट करणे आवश्यक आहे. त्यातूनही जर ही लक्षणे तीव्र असतील तरच या प्रयोगशाळा तपासणी करून घेणे आवश्यक आहे. यामध्ये रुग्णाला घरीच विलगीकरणात ठेवणे आणि त्या रोगप्रतिकारक औषधे देणे हा उपाय यामध्ये सांगितला आहे.
सी वर्गवारी
- तिसऱ्या सी वर्गवारी श्वास घेण्याला अडचण, छातीत दुखणे, उच्च रक्तदाब, नखे दुखणे यासारखी लक्षणे असतील तर त्यांचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवणे आवश्यक आहे. तसेच गरज पडल्यास संबंधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे असे यात नमूद केले आहे.
हे आहेत अपवाद
गरोदर महिला, पाच वर्षांखालील मुले आणि 65 वर्षांवरील वृद्ध, कोमॉबिडीटी असलेल्या व्यक्ती, केमोथेरपी सुरू असलेल्या आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती यांच्यात लक्षणे आढळल्यास विशेष काळजी घेऊन त्यांची प्रयोगशाळा तपासणी करणे आवश्यक असल्याचे या आदेशात म्हटले आहे.