पिंपरी : तीन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा निवडून आलेल्या नगरसेवकांना किंवा त्यांच्या वारसांना नगरसेवक पदासाठी कायमस्वरूपी आरक्षण ठेवण्याचा निर्णय गुरुवारी महासभेने घेतला. महापालिकेच्या ३४व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी महापालिकेत आयोजित अभिरूप सभेत महापौरांनी आयुक्तांची तर आयुक्तांनी महापौरांची भूमिका वठविली. नगरसेवक अधिकाऱ्यांच्या तर अधिकारी नगरसेवकांच्या भूमिकेत होते. या सभेच्या कार्यक्रम पत्रिकेवर तीन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा निवडून आलेल्या नगरसेवकांना किंवा त्यांच्या वारसांना नगरसेवक पदासाठी कायमस्वरूपी आरक्षण ठेवणे, नवीन प्रभागरचना व आरक्षण यामुळे विस्थापित होणाऱ्या विद्यमान विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी सन २०२१ची अंदाजे लोकसंख्या विचारात घेऊन त्या प्रमाणात वाढीव प्रभाग निर्माण करणे, मतदानाची सुटी रिसॉर्ट आणि हिल स्टेशनवर साजऱ्या करणाऱ्यांना मतदान प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी मतदान करणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहनपर भत्ता सुरू करणे, शहराला चंद्रावरून पाइपलाइनद्वारे पाणी आणण्याला होत असलेला विलंब लक्षात घेऊन भाववाढ फरक कलमानुसार वाढीव खर्च अदा करणे, निवडून येणाऱ्या नगरसेवकांना देश व विदेशांतर्गत प्रत्येकी पाच दौरे बंधनकारक करणे, ऐनवेळी अभ्यास दौऱ्याच्या स्थळांमध्ये वाढ करून त्या प्रमाणात वाढीव खर्च अदा करण्यास कायमस्वरूपी धोरण निश्चित करणे आदी विषय होते. उल्हास जगताप यांनी नगरसेवकांची भूमिका साकारली. ते म्हणाले की, निवडणुका तोंडावर आल्या आहेत. नागरिकांना आम्हाला सामोरे जायचे आहे. विकासकामे करण्यासाठी महासभेपुढे ऐनवेळचे विषय यायला हवेत.’’ यासह चंद्रावरून पाइपलाइनद्वारे पाणी आणण्याच्या कामाला झालेल्या विलंबामुळे नगरसेवकांच्या भूमिकेत असलेल्या प्रवीण तुपे आणि उल्हास जगताप यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. त्यावर महापौरांच्या भूमिकेत असलेल्या आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांना दोष देऊ नका, आपली ‘स्मार्ट सिटी’ बनली असून, देशात आपल्या शहराचे नाव आहे. चंद्रावरून पाणी आणल्यास आपण कुठले कुठे जाऊ, याचा विचार करावा.’’ या विषयाला संभाजी ऐवले यांनी एटीएमद्वारे पाणीपुरवठा करण्याची उपसूचना दिली. तसेच यशवंत माने यांनी या कामासाठी संपूर्ण यंत्रणा विकसित करून एजन्सी नेमावी, पुढील सभेत त्याबाबतचा अहवाल सादर करावा, अशीही सूचना केली. त्यानंतर महापौर बनलेल्या दिनेश वाघमारे यांनी या विषयाला तत्त्वत: मान्यता देण्यासह या विषयाच्या अभ्यासासाठी चार सदस्यीय समिंती नेमण्याचे आदेश दिले. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या प्रत्येकी दोन नगरसेवकांचा समावेश असेल, असेही नमूद केले.(प्रतिनिधी)
तीन वेळा निवडून या, आरक्षण मिळवा
By admin | Published: October 14, 2016 5:33 AM