पुणे : चांगलं कुटुंब मिळणं हे फक्त नशीब असतं पुढची वाटचाल तुम्हाला तुमचीच करावी लागते असे मत राेहित पवार यांनी व्यक्त केले. पुण्यात एका खासगी कार्यक्रमात ते बाेलत हाेते. यावेळी अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित हाेते.
पवार यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते म्हणाले, नेहमी नशिबावर अवलंबून राहू नका, आत्मविश्वास ठेवा. सर्वांना समान संधी असतात जाे कष्ट करताे त्याला यश मिळते. आपण नेहमी आई वडीलांचा आदर केला पाहिजे. उद्याचा विचार करु नका आजचा विचार करा. एकमेकांशी संवाद साधत रहा. संधीचे रुपांतर यशात करण्यासाठी निर्णय घेण्याची क्षमता हवी. चुका झाल्या तर खचून जाऊ नका. चुकांमधून शिका, त्यातून काय करता येईल याचा विचार करा. युवकांनी युवकांसाठी संधी एक व्यासपीठ निर्माण करायला हवे. तसेच एकत्र येत एकमेकांच्या अडचणी साेडवायला हव्यात.
सयाजी शिंदे म्हणाले, सह्याद्रीचा डाेंगर हा माझ्यासाठी माझा गाॅडफादर आहे. आपल्या आयुष्यात जाे दिवस येताे, त्याचं स्वागत करायला हवं. आयुष्यात पैसे नाही तर शांती महत्त्वाची आहे. साधं हाेणं अवघड आहे. नेहमी आपला आपल्यावर विश्वास असायला हवा. कुठली भाषा प्रमाण हे सांगताना शिंदे म्हणाले, आपल्या आईची भाषा जगातील सर्वाेत्तम भाषा असते. आपल्या जागेवरुन पुढे गेल्यानंतर तुम्हाला यश मिळेल. एका जागेवर उभे राहिलात तर यश मिळणार नाही. आयुष्यात तुम्हाला आवडतं ते करा.