नीरा : ‘सर्वांसाठी घरे’ योजनेला गती देण्यासाठी ग्रामविकास विभागाने सरकारी जागांवरील निवासी अतिक्रमण नियमित करण्याचे धोरण आखले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली असून, तालुकास्तरावर कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार पुरंदर तालुक्यासह इतर तालुक्यांतून अतिक्रमणांच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. यामुळे घरकुलाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो अतिक्रमणधारकांचे घराचे स्वप्न आता पूर्ण होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक गरजू व बेघर कुटुंबाला घर मिळावे, यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. त्याचबरोबर, राज्याकडून सुरू असलेल्या शबरी आवास योजना, आदिम आवास योजना, रमाई आवास योजनात घरकुलांसाठी जागांची मोठी अडचण निर्माण झाली होती. अनेक लाभार्थी या योजनांसाठी पात्र असूनही स्वमालकीची जागा नसल्याने त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येत नव्हता. अशा लाभार्थ्यांत सरकारी जागेवर अतिक्रमण करून राहत असलेल्या कुटुंबांचा समावेश मोठ्या प्रमाणावर होता. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेला घरघर लागली होती.
ग्रामविकास विभागाने वस्तुस्थिती लक्षात घेऊन १ जानेवारी २०११ पर्यंतची निवासी अतिक्रमणे दंड आकारून नियमित करण्याचा धोरणात्मक निर्णय १६ फेब्रुवारी २०१८ रोजी घेतला. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी २० आॅगस्ट २०१८ रोजी नव्याने मार्गदर्शक सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या. दरम्यान, पात्र गरीब, दलित, आदिवासी यांचे शासनाच्या धोरणाप्रमाणे पात्र ठरत असलेले अतिक्रमण नियमित करण्याची मागणी नरवीर राजे उमाजी नाईक सामाजिक विकास ट्रस्ट, श्रावणबाळ मातापिता सेवा संघ तसेच इतर सामाजिक संघटनांनी लावून धरली होती. शासन निर्णयाची अंमलबजावणी प्रभावी व्हावी, यासाठी उमाजी नाईक ट्रस्टकडून कालबद्ध कार्यक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, यासाठी विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते.
अखेर पंचायत समिती स्तरावरून कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आले आहे. त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी मुख्यत्वाने पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी व संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांवर आहे. जिल्ह्यात या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे. काही ठिकाणी मात्र कामकाज कासवगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान, अतिक्रमण नियमित करण्याच्या कार्यवाहीची प्राधान्याने अंमलबजावणी करण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आल्या आहेत.