पुणे : कै. बाबुराव सणस मैदानासमोरील वसंतदादा पाटील प्रशिक्षण केंद्राच्या जागेवर आरोग्य केंद्र उभारण्याचा घाट घातला जात असून हे केंद्र अन्यत्र उभारण्याची मागणी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव संजय बालगुडे यांनी केला आहे.
सणस मैदानासमोर असलेली जागा विकास आराखड्यात व्यापारी क्षेत्र म्हणून दर्शविलेली आहे. या ठिकाणी आरोग्य केंद्र उभारता येणार नाही. याठिकाणी पाटील यांच्या नावाने प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी पालिकेने दोन वेळा अंदाजपत्रकात एक कोटी रुपयांची तरतूद केलेली होती. निविदा प्रक्रिया राबवून कामही सुरु करण्यात आले होते. प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे ७५ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.
आता याठिकाणी सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाने आरोग्य केंद्र सुरु करण्याचा घाट घातल्याचा आरोप बालगुडे यांनी केला आहे. या जागेच्या अगदी जवळ दोन रुग्णालये आहेत. याठिकाणी आरोग्य केंद्र उभे केले जाऊ शकते. खासगी डॉक्टरांना पालिकेने दिलेल्या जागांवर आरोग्य केंद्र उभारा. परंतु, प्रशिक्षण केंद्राची जागा बदलू नका अशी मागणी बालगुडे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.