पुणे : शारदीय नवरात्र उत्सवाला गुरुवार ७ तारखेपासून पासून प्रारंभ होत आहे. या दिवशी चित्रा आणि वैधृती योग असला, तरी Ghatasthapana तिथीप्रधान असल्याने ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे पाचपासून ते दुपारी एक वाजून ४५ मिनिटांपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त आहे. या वेळेत Ghatasthapana करता येईल. यावर्षी घटस्थापनेपासून दसरा नवव्या दिवशी असला, तरीही नवरात्रोत्थापन आठव्या दिवशीच असल्याने यंदा नवरात्र आठच रात्रींचे आहे. चतुर्थीचा क्षय झाल्याने नवरात्र आठ रात्रींचे झाले आहे, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.
यंदाचे नवरात्र ७ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत असून घराघरांमध्ये महिला-युवती उत्साही आणि चैतन्यपूर्ण वातावरणात Ghatasthapana करणार आहेत. १० ऑक्टोबरला रविवारी ललिता पंचमी आहे. १२ ऑक्टोबरला महालक्ष्मीपूजन (घागरी फुंकणे) आहे. १३ ऑक्टोबर रोजी महाष्टमीचा उपवास आहे, तर १४ ऑक्टोबरला गुरुवारी नवरात्रोत्थापन (नवरात्र समाप्ती) आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी, दि. १५ रोजी दसरा आहे.
ज्यांना यंदा कोरोनाच्या संकटामुळे किंवा अशौचामुळे ७ ऑक्टोबरला घटस्थापना करणे शक्य होणार नाही, त्यांनी अशौच निवृत्तीनंतर (अशौच संपल्यावर) ९ ऑक्टोबर, १० ऑक्टोबर, १२ ऑक्टोबर किंवा १३ ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी व १४ रोजी नवरात्रोत्थापन करावे, असे दाते यांनी सांगितले.