पुणे : लेखनाच्या संख्येत वाढ झाली असली तरी गुणवत्तेत वाढ झालेली नाही. गझलकारांनी त्या-त्या कल्पना व प्रतिमांभोवती न फिरता नाविन्याचा शोध घ्यायला हवा. तसेच गझल काव्यप्रकाराला जागतिक संस्कृतीमध्ये नामाचे नाही तर मानाचे पान मिळाले पाहिजे; तेव्हाच गझलेचा जागतिक संचार झाला असे म्हणता येईल, असे मत ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी गुरुवारी व्यक्त केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त आयोजित ‘मराठी गझलेचा जागतिक संचार’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी काळे बोलत होते. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू , अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, मराठी विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश संगोलेकर उपस्थित होते.गझल हे वृत्त नाही तर एक काव्य प्रकार आहे, असे नमूद करून काळे म्हणाले, ‘‘गालिब, सुरेश भट यांच्या लेखनाचा आत्ताच्या मराठी गझलकारांवर मोठा परिणाम झालेला दिसून येतो. गझलेच्या काही जमेच्या बाजू असून काही मर्यादा आहेत. गझल लेखन तंत्रशुद्ध असले पाहिजे. त्यात तंत्रशरणता येऊ नये. कवीचे हृदय जळणार नाही तोपर्यंत खरी कविता निर्माण होणार नाही. त्यामुळे वरवरचा अनुभव व्यक्त न करता अनुभूतीच्या डोहामध्ये गझलकारांना उतरता आले पाहिजे.’’श्रीपाद जोशी म्हणाले, ‘‘गझल हा वाङ्मय प्रकार नाही तर ती एक संस्कृती आहे. अरब जगतात गझल या वाङ्मय प्रकाराचे रक्षण करण्यासाठी मोठी चळवळ चालू आहे. त्यामुळे वरवर विचार न करता गझलेच्या आत्म्याचा विचार केला पाहिजे.’’प्रास्तविकात सांगोलेकर यांनी चर्चासत्राच्या आयोजनाची भूमिका मांडली. या प्रसंगी त्यांच्या मराठी गझल प्रवाह आणि प्रवृत्ती या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. (प्रतिनिधी)
‘गझल’ला मानाचे पान मिळावे
By admin | Published: January 13, 2017 3:33 AM