पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात अनेक वर्षांपासून घंटागाडीवर काम करणाऱ्या ३१० कर्मचाऱ्यांचे वेतन आणि दिवाळी बोनसमध्ये भरीव वाढ करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी अतुल शितोळे होते. १९९७मध्ये ३७३ कर्मचारी घंटागाडीवर कामाला होते. घरोघरी जाऊन कचरा गोळा करून शहर स्वच्छ ठेवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. मात्र, त्यांना त्या तुलनेत मोबदला मिळत नाही. वेतनवाढीचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांच्या वेतनात वाढ करण्यात येणार आहे. सध्या त्यांना साडेअकरा हजार रुपये वेतन असून, त्यामध्ये साडेतीन हजारांची वाढ केली जाणार आहे. यासह गेल्या वर्षी देण्यात आलेला तेरा हजार रुपयांचा बोनस यंदा १५ हजार रुपये देण्यात येणार असल्याचे शितोळे यांनी सांगितले. १९९७मध्ये एकूण ३७३ कर्मचारी घंटागाडीवर कामास होते. त्यांपैकी २८ जण मृत झाले, तर काहीजण सतत गैरहजर राहत असल्याने त्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. अशाप्रकारे ३१० कर्मचाऱ्यांना या वाढीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. महापालिकेने घेतलेल्या या निर्णयाबाबत कामगारांमधून समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)शहरातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्ते अपघातात वाढ झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांवरून स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. लाखो रुपये खर्च करूनही खड्डे जसेच्या तसे आहेत. खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. यावर आयुक्त म्हणाले की, पंधरा दिवसांत शहरातील रस्ते खड्डेमुक्त केले जातील.
घंटागाडी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार ‘गोड’
By admin | Published: October 07, 2015 4:17 AM