Pune: घोडगंगा कारखाना प्रशासकाच्या ताब्यात द्यावा लागेल; अजित पवारांची अशोक पवारांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 05:53 PM2024-03-04T17:53:52+5:302024-03-04T17:54:57+5:30
घोडगंगा कारखान्याच्या बाबतीत जी चूक झाली ती आगामी काळात सुधारू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला....
मांडवगण फराटा (पुणे) : अशोक पवार यांनी स्वतःचा खासगी कारखाना चांगला चालवला. मात्र घोडगंगा बंद पाडला. कारखाना अडचणीत असताना आपल्या अनुभवी नवख्या मुलाच्या ताब्यात देऊन त्याला अध्यक्ष केले. शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. हा कारखाना बंद पडला असल्याने संचालक मंडळाला काही दिवस देतो. त्यानंतर मात्र मी सहकारी कायद्यानुसार नोटीस काढतो. हे संचालक मंडळ कारखाना चालविण्यास सक्षम नसल्याने प्रशासकाच्या ताब्यात द्यावे लागेल. मला शेवटी सभासदांचे हित महत्त्वाचे आहे. घोडगंगा कारखान्याच्या बाबतीत जी चूक झाली ती आगामी काळात सुधारू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे शेतकरी मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित पवार बोलत होते. या सभेला राज्याचे प्रवक्ते उमेश पाटील, जिल्हा निरीक्षक सुरेश घुले, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात, महिला जिल्हाध्यक्षा मोनिका हरगुडे, वैशाली नागवडे, श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे, हवेली तालुका अध्यक्ष दिलीपनाना वाल्हेकर, जिल्हा परिषद सदस्य कुसुम मांढरे, राजेंद्र जगदाळे, कात्रज दूध संघाच्या संचालक केशरताई पवार, निखिल तांबे, स्वप्निल ढमढेरे, बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, विजेंद्र गद्रे, दादासो कोळपे, आरती भुजबळ, अमोल वरपे, तज्ञिका कर्डिले, शरद कालेवार, श्रुतिका झांबरे, आबाराजे मांढरे, राजेंद्र कोरेकर, श्रीनिवास घाडगे, कुंडलिक शितोळे, आबासो पाचुंदकर, समीक्षा फराटे, अनुराधा घाडगे, दिपाली नागवडे आदी उपस्थित होते. पूर्व भागातील व तालुक्यातील अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पक्षात प्रवेश केला.
अजित पवार म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १,२५० कोटी रुपये मंजूर झाले. त्यामुळे अधिकाधिक कामे ग्रामीण भागातही आगामी काळात सुरू होतील. दौंड व शिरूर तालुक्यात सर्वाधिक ऊस आहे. शिरूर तालुक्यातील सुमारे २ लाख टन ऊस दौंड शुगर कारखान्याने गाळपासाठी नेला आहे. कुणाचेही नुकसान होऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो. शेतकऱ्यांनी इतर कारखान्यांना देखील ऊस गाळपसाठी देताना वजनकाटा चेक केला पाहिजे.
यावेळी प्रास्ताविक तालुकाध्यक्ष रवींद्र काळे यांनी केले. सुधीर फराटे इनामदार, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, दादा पाटील फराटे आदींची भाषणे झाली.
झालेली चूक दुरुस्त करणार
घोडगंगा कारखाना कामगार प्रश्नाबाबत बैठक घेतली होती. मात्र ती बैठक फोल ठरली. त्यानंतर कारखाना बंद पडला. कारखान्याला मुबलक ऊस उपलब्ध आहे. अनुकूल परिस्थिती आहे. कारखाना काटकसरीने चालवायला पाहिजे. कोजन, डिस्टलरी आदी प्रकल्प आहेत. गरज आहे तेवढाच स्टाफ ठेवला तरच कारखाना अडचणीतून बाहेर येऊ शकतो. अशोक पवार वेडंवाकडं करेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. स्टेजवर असलेले सोडून इतर कुणीही उभे राहून कारखाना सुरू करून दाखवावा हे चॅलेंज करतो. ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांनी कारखाना मातीत घातला. चूक झाली परंतु ती चूक दुरुस्त करायची असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
अमोल कोल्हेंचा राजकारण पिंड नाही
डॉ. अमोल कोल्हे हे खासदार झाल्यानंतर दोन वर्षांनंतर माझ्याकडे येऊन राजीनामा द्यायचा आहे. व्यावसायिक नुकसान झाले. रोज वेळ द्यावा लागतो असे म्हणत होते. शेवटी ते कलावंत आहेत. त्यांचा राजकारण हा पिंड नाही. आजही ते निलेश लंके यांच्या मतदारसंघात नाटकाचे प्रयोग करण्यात व्यस्त आहेत. देशात गोविंदा, हेमामालिनी, शत्रुघ्न सिन्हा, अमिताभ बच्चन असे अनेक सिनेकलावंत राजकारणात आले. मात्र त्यांनी नंतर राजकारणात फार काळ टिकले नाही. नुकसान सर्वसामान्य माणसाचे झाले. या निवडणुकीत माणसात असणारा उमेदवार देईल त्यालाच निवडून द्या, असे त्यांनी सांगितले.