प्रज्ञा केळकर - सिंग
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान येथे पार पडल्यानंतर घुमान रेल्वे मार्गाशी जोडले जावे, अशी मागणी सरहद संस्थेतर्फे करण्यात आली होती. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर आणि घुमान रेल्वे मार्गाने जोडले जावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. ब्यास ते कादियान या रेल्वे मार्गाची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यामुळे घुमान-पंढरपूरचा रेल्वेचा प्रश्नही मार्गी लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंजाबच्या ज्या भूमीत संत नामदेवांनी मानवतेचा नंदादीप लावला, ती घुमाननगरी वारक-यांचे तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूरशी जोडली जावी, यासाठी गेल्या चार-पाच वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. पंजाब आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक बंध दृढ व्हावेत, यादृष्टीने ८८ वे साहित्य संमेलन घुमनाला आयोजित करण्यात आले होते. यावेळी घुमानपर्यंत रेल्वे पोहोचावी, अशी मागणी सरहद संस्थेतर्फे करण्यात आली होती. तत्पूर्वी विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पंढरपूर ते घुमान रेल्वे मार्गाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांनी आयुष्यातील दीर्घ काळ घुमानमध्ये वास्तव्य केले. घुमान येथील गुुरुद्वारा आणि मंदिरातून त्यांच्या स्मृती जपल्या गेल्या आहेत.
महाराष्ट्र आणि पंजाबमधील नागरिकांना राष्ट्रीय एकात्मता जपण्याच्या दृष्टीने पर्यटन सोपे व्हावे, यासाठी पंढरपूर आणि घुमान रेल्वे सुरु व्हावी, अशा आशय विजयसिंह मोहिते पाटील यांनी पत्रात नमूद केला होता. ‘सरहद संस्थेतर्फे घुमानला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. परस्पर संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने सरकारनेही सकारात्मक पाऊल उचलण्यात यावे’, अशी आशा पत्रातून व्यक्त करण्यात आली होती. पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची दखल घेत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. ब्यास ते कादियान रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्याने घुमान ते पंढरपूर रेल्वेच्या कामालाही गती मिळेल, असे सुत्रांकडून सांगण्यात आले.विजयसिंह मोहिते-पाटील घुमान ते पंढरपूर मार्गाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. यानंतर दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासनही दिले होते. या रेल्वे मार्गाच्या मागणीबाबत सातत्याने पाठपुरावा करणार आहे. घुमानपर्यंत रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्याने ही मागणीही पूर्णत्वास जाईल, अशी आशा वाटते.