- सुषमा नेहरकर-शिंदे, पुणेराखी पौर्णिमेच्या निमित्ताने जिल्ह्यातील ७०० गावांतील तब्बल १० हजार महिलांना स्वच्छतागृहाची भेट देण्यात येणार आहे. पुणे जिल्हा परिषदेने रोटरी क्लबच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू केला असून, ही गावे निर्मलग्राम होणार आहेत. संपूर्ण पुणे जिल्हा लवकरात लवकर निर्मल करण्यासाठी सध्या जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांच्या पुढाकारामुळे रोटरी क्लबच्या सहकार्याने निर्मलग्रामच्या मोहिमेला आणखी गती देण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांपासून केंद्र शासनाची निर्मलग्राम अभियान योजना राबविण्यात येत आहे. त्यापूर्वी राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरूआहे. यामुळे राज्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात निर्मलग्राम अभियानात चांगले काम झाले आहे. परंतु जिल्हा शंभर टक्के हगणदरीमुक्त करण्यासाठी मोठा टप्पा गाठावा लागणार आहे. जिल्ह्यात १४०४ पैकी केवळ २३३ ग्रामपंचायती शंभर टक्के हगणदरीमुक्त झाल्या आहे. तर एका गावात ५०पेक्षा कमी शौचालये बांधणे शिल्लक असलेल्या गावांची संख्या ६९१ आहे. त्यामुळे किमान ही गावे हगणदरीमुक्त केल्यास मोठे काम होईल. सध्या शौचालयासाठी २५ ते ३० हजार खर्च येतो. त्यामुळे बांधकामासाठी निधी उपलब्ध न करता तयार शौचालयाच्या किटचे वाटप करण्यात येईल. याची किंमत २२ हजार रुपयांपर्यंत जाते. यामध्ये रोटरी क्लबच्या वतीने १० ते १२ हजार एका शौचालयासाठी देण्यात येतील, तेवढाच वाटा जिल्हा परिषद उचलणार आहे. यासाठी १२ कोटींची तरतूद करावी लागणार असल्याचे उमाप यांनी सांगितले.जिल्ह्यात आजही अनेक गावांमध्ये महिला उघड्यावर शौचालयाला जातात, ही अत्यंत शरमेची बाब आहे. शौचालय नसल्यामुळे महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यामुळेच रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दहा हजार शौचालयांचे मोफत वाटप करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. रोटरी क्लबच्या मदतीने हे वाटप करण्यात येणार आहे. शौचालयाबरोबरच त्याचा स्नानगृह म्हणूनही वापर करता येईल, यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. - कांतिलाल उमाप, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
१० हजार महिलांना स्वच्छतागृहांची भेट
By admin | Published: August 29, 2015 3:40 AM