पुणे : विश्वाची उत्पत्ती व व्याप्ती याविषयी आपल्या मनात नेहमीच कुतूहल असते. कृष्णविवर, जीवसृष्टीची निर्मिती याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न वेळोवेळी होत आहे. आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतानंतर लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह लेबोरेटरी (लायगो) प्रकल्पाद्वारे खगोलशास्त्राच्या गुरुत्वीय अंगाचा शोध घेणे शक्य झाले आहे; किंबहुना लायगो प्रकल्प गुरुत्वीय खगोलशास्त्राचा प्रारंभच आहे, असे मत आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र व खगोलभौतिकी संशोधन केंद्र (आयुका) येथील शास्त्रज्ञ डॉ. वरुण भालेराव यांनी व्यक्त केले.मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागाचा सुवर्णमहोत्सव व वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या गुरुत्वलहरी या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. यशवंत घारपुरे होते. याप्रसंगी परिषदेच्या सचिव नीता शहा, माजी कार्याध्यक्ष विनय र. र. उपस्थित होते.आपल्या जीवनात या संशोधनाचा थेट उपयोग दिसत नसला, तरी भविष्यात या लहरी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. प्रा. यशवंत घारपुरे म्हणाले, गुरुत्वीय लहरींच्या शोधामुळे खगोलशास्त्रात क्रांती होणार आहे. या संशोधनात भारतीयांचा समावेश भूषणावह आहे. त्याविषयी माहिती जाणून घेण्याचा आणि त्याचा प्रसार करण्याचा प्रयत्न मराठी विज्ञान परिषद करीत आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान जागृती होण्यासाठी विज्ञान रंजन स्पर्धा घेण्यात येत असून, अधिकाधिक लोकांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
लायगो प्रकल्पामुळे गुरुत्वीय खगोलशास्त्राचा प्रारंभ
By admin | Published: August 29, 2016 3:38 AM