पुणे : विधानसभेच्या कसबा व चिंचवड या दोन मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीसाठी आज, रविवारी मतदान होत आहे. कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर व महायुतीचे हेमंत रासने यांच्यात, तर चिंचवडमध्ये महायुतीच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे व बंडखोर अपक्ष राहुल कलाटे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. कसब्यात तब्बल ३० वर्षे भाजपचे वर्चस्व टिकवून ठेवणारे खासदार गिरीश बापट शेवटच्या काही मिनिटात मतदानाचा हक्क बजावला आहे.
गेल्या दोन तीन महिन्यापासून बापट यांची प्रकृती अस्वस्थ आहे. त्यांना वारंवार रुग्णालयात जावे लागत आहे. आजारी असूनही भाजपच्या प्रचारादरम्यान स्वतः मैदानात उतरून पदाधिकारी यांच्यासाठी मेळावा घेतला होता. तसेच हेमंत रासने यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही ते उपस्थित होते. आज मतदानासाठी काही मिनिटे बाकी असताना बापट यांनी मतदान केले. नाकात नळ्या, ऑक्सिजन सिलेंडर, व्हिल चेअरवर असतानाही त्यांनी आजारपण अडथळा ठरू न देता, त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पाच वाजण्याच्या सुमारास अहिल्यादेवी शाळेच्या मतदान केंद्रावर ते पोहोचले आणि मतदान केले.
दरम्यान कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झाले . कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर व महायुतीचे हेमंत रासने यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीसाठी सकाळी सात वजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.सनईचे सुर, रांगोळयांच्या पायघडया घाुलन मतदारांना गुलाबाचे फुल देउन स्वागत करण्यात आले. सकाळी ७ ते ९ यावेळेत ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केले. मानिग वॉक वरून थेट येत काही नागरिकांनी मतदान केले. मात्र ९ते ११ यावेळेत मात्र मतदान कमी झाले. दुपारी १ नंतर मतदार बाहेर पडण्यास सुरवात झाली. विशेष करून महिला वर्गांने मोठया प्रमाणात दुपारी मतदान केले. कसबा मतदार संघाच्या पुर्व भागात मतदान केद्रावर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र या मतदारसंघातील पश्चिम भागातील मतदान केंद्रावर नागरिकांची गर्दी कमी होती. सांयकाळी पाच नंतर महात्मा फुले पेठेतील आचार्य विनोबा भावे शाळा केद्रांवर मतदारांनी मोठयाप्रमाणात गर्दी केली होती.
२ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. कसब्यातील मतमोजणी कोरेगाव मार्क येथील वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. चिंचवडमधील मतमोजणी कामगार भवन, थेरगाव इथे होणार आहे. दोन्ही मतदारसंघांत महाविकास आघाडी व महायुतीने निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे निकालाबाबत पुणे जिल्ह्यालाच नाही, तर राज्यालाही उत्सुकता आहे.