पुणे : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सोमवारी पुणे दौऱ्यावर आले होते. डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा या संस्थेच्या १२ व्या पदवी प्रदान कार्यक्रमाला ते उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. गिरीश बापट आणि राजनाथ सिंह यांनी लोकसभेत काही काळ एकत्र काम केले होते. बापट यांच्या पत्नी, पुत्र गौरव, स्नुषा स्वरदा आदी या वेळी उपस्थित होते.
गिरीश बापट हे कडवट आणि लढवय्ये नेते होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाला स्थानिक पातळीवर मजबूत करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. गिरीश बापट यांना माझ्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत राजनाथ सिंग यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नगरसेवक ते खासदार असा जवळपास चाळीस वर्षांचा त्यांचा प्रवास होता. टेल्को कंपनीत कामाला असलेले गिरीश बापट राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत काम करत आपल्या सामाजिक आयुष्याला सुरूवात केली होती. पुणे शहर भाजपचे सचिव म्हणून १९८० साली त्यांची नियुक्ती झाली. तर ८३ साली ते पहिल्यांदा पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर बापट तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा आमदार राहिले आहेत. बापट १९९५ साली पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. तर २०१९ च्या निवडणुकीत गिरीश बापट यांची पुण्याच्या खासदारपदी निवड झाली.
त्यांच्या निधनानंतर पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले, एक उत्तम संसदपटू, उत्तम वक्ते आपल्यातून निघून गेले, महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या गिरीशभाऊंनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य, विकासाचं राजकारण केलं अशा भावना राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्या होत्या