पुणे: माजी मंत्री, खासदार गिरीश बापट यांची संपूर्ण कारकीर्द पुण्यात झाली असली तरी, त्यांचे विदर्भाशी एक वेगळेच नाते राहिले आहे. त्यांचे मूळ गाव अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर हे आहे. आजही तेथे त्यांची शेती असून, गतवर्षीपर्यंत बापट तेथे नित्याने जाऊन कामकाज पाहात होते.
बापट यांचे वडील भालचंद्रराव हे कँटोन्मेंट बोर्डात नोकरीला होते. बदली होऊन ते पुण्यातील देहूरोड कँटोन्मेंट येथे आले अन् तळेगाव दाभाडे येथेच स्थिरावले. तरीही मूळ गावाशी जोडलेली नाळ त्यांनी कधीच तुटू दिली नाही. बापट कुटुंबाची सावंगी मग्रापूर येथे शेती असून, स्वत: गिरीश बापट यांनी या शेतीची निगा राखली आहे.
शेती करण्याबरोबरच २०१७ मध्ये त्यांनी वात्सल्य गोशाळा आणि गोवंश संशोधन केंद्राची उभारणी केली. या केंद्राची ख्याती विदर्भात सर्वदूर पोहोचली असून, त्यांची गोशाळा व संशोधन केंद्र ४२ एकरांमध्ये विस्तारले आहे. भाकड गोवंशाची निगा राखण्याबरोबरच देशी गाईंचे प्रजनन यावर या ठिकाणी काम केले जाते.
गिरीश बापट यांची आई प्रतिभा यांचे माहेर चांदूर रेल्वे तालुक्यातील सोनोरा भिलटेक येथील. त्या जोशी घराण्यातल्या. बापट यांचे एक मामा चांदूर रेल्वेला, तर दुसरे बडनेराला वास्तव्याला आहेत. त्यांचे चुलत बंधू विश्राम बापट हे अमरावतीला असतात. बापट यांचे निकटवर्ती सोपानभाऊ गोडबोले यांनी ही माहिती दिली.