पुणे : पक्षातील नव्या-जुन्या पदाधिकाऱ्यांबरोबर वेगवेगळ्या कारणांनी निर्माण झालेली मतभेदांची दरी बुजवण्यासाठी युतीचे उमेदवार गिरीश बापट प्रयत्न करीत आहेत. लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात कार्यकर्त्यांबरोबर थेट संवाद साधतानाच पक्षसंघटनेतील काही नाराज पदाधिकाऱ्यांच्याही ते भेटी घेत त्यांच्यावर निवडणुकीशी संबंधित वेगवेगळ्या जबाबदाºया सोपवित आहेत.
प्रतिस्पर्धी उमेदवार अद्याप जाहीर होत नसल्यामुळे बापट यांनी हा वेळ मतभेदांची दरी बुजवण्यासाठी दिला आहे. त्याची सुरुवातच त्यांनी मावळते खासदार अनिल शिरोळे यांच्यापासून केली. उमेदवारी जाहीर झाल्याच्या पहिल्याच दिवशी पक्ष कार्यालयात खासदारांची भेट घेऊन मनोमिलन झाल्याचे जाहीरपणे स्पष्ट केले. शिरोळे यांनीही त्यांना प्रतिसाद देत त्यानंतर प्रचाराच्या पहिल्या सभेत हजेरीही लावली. लोकसभेसाठी उमेदवारी मागितल्यामुळे शहराध्यक्ष योगेश गोगावले व त्यांच्यातही मळभ तयार झाल्याचे दिसत होते. त्यातच गोगावले थेट पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर संपर्क साधतात, हे लक्षात आल्यामुळे बापटही नाराज झाल्याची चर्चा होती. मात्र आता बापट यांनी गोगावले यांना बरोबर घेत ते प्रचाराचे नियोजन करतील, असे जाहीरपणे स्पष्ट केले आहे. गेल्या काही वर्षांपासून माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर पक्षातील सक्रियपणापासून बाजूला गेले होते. महापालिका निवडणुकीतही त्यांना बाजूला बसणे भाग पाडण्यात आले. बापट यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तेही प्रचारात सक्रिय झाले आहेत. त्यांना पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून पाठवण्यात येत आहे. त्याशिवाय खासदार संजय काकडे यांना मानणारा नगरसेवकांचा गट बापट यांच्यापासून लांब होता. त्यांनाही बापट यांनी जबाबदाºया देत सामावून घेतले आहे.आमदारांच्या उपस्थितीत मेळावेच्सहाही विधानसभा मतदारसंघांत भाजपचेच आमदार आहेत. काही बापट यांना मानणारे, तर काही त्यांच्यापासून अंतर राखून असलेले आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रात जाऊन गेल्या चार दिवसांत बापट यांनी त्यांच्याच उपस्थितीत कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. पालकमंत्री असलेले बापट यांचे राजकीय वजन निवडणुकीनंतर वाढणार असल्याने आमदारांनीही आता त्यांच्याबरोबर जुळवून घेत सक्रिय राहण्याचे वचन दिले.