गिरीश बापटांना 2014 मध्येच खासदार व्हायचे होते पण..., अजितदादांनी सांगितली आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 02:27 PM2023-03-31T14:27:08+5:302023-03-31T14:28:02+5:30
अजित पवार यांनी घेतली खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची भेट
पुणे: बापट यांना २०१४ मध्येच खासदार बनायचं होतं. त्यांनी मला सांगितलं की "अजित आता आमदारकी बस झाली मला खासदार होयचं आहे. परंतु तेव्हा भाजपने अनिल शिरोळे यांना तिकीट दिलं. त्यामुळे त्यांना आमदार व्हावं लागलं. त्यानंतर सुदैवाने देवेंद्र फडणवीस यांचा सरकार आलं आणि बापट साहेब यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्याची आठवण विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितली आहे. पुणे दौऱ्यावर असताना अजितदादानी खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पवार म्हणाले, गिरीश बापट यांचे २ दिवसांपूर्वी निधन झाले. मी नाशिक मध्ये होतो म्हणून मला येता आलं नाही. आज मी त्यांच्या कुटुंबीयांचा भेट घेतली. १९९१ साली मी पुण्याच्या राजकारणात आलो. आणि ९५ मध्ये बापट पहिल्यांदा कसबा विधानसभा मधून निवडून आले. आणि तेव्हा पासून आम्ही आमदार म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन काम करण्याची त्यांची पद्धत होती. कधी ही टोकाची भूमिका घेऊन त्यांनी कामकाज केलं नाही. अनेक नेते गेल्यावर आपण म्हणतो पोकळी निर्माण झाली पण खरोखर भाजपला पुणे शहरात वाढवण्याचे काम कोणी केलं असेल तर गिरीश बापट यांनी केलं.
आज ही पटत नाही बापट साहेब आपल्यामधून गेले
सगळ्यांच्या मध्ये मिसळून राहणार व्यक्तिमत्व आणि मैत्री सांभाळण्याचे काम त्यांनी केलं. पक्षात वैचारिक भूमिका वेगळी त्यांचे नेते वेगवेगळे पण मैत्री म्हणून तर सगळ्यांशी वागायचे ते वाखंयजोगी होतं. आमच्यामध्ये अनेक बैठक झाल्या पण यात आमच्यामध्ये कधी ही ताणतणाव झाला नाही. बापट साहेब अत्यंत मिश्किल होते. काही नावं त्यांनी मला दिली आणि ती मी पुढे बोललो आणि ती फार दूर पर्यंत प्रसिद्ध झाली. पण त्याचे खरे सूत्रधार बापट साहेब होते. आज ही पटत नाही बापट साहेब आपल्यामधून गेले आहेत.