पिंपरी : थुंकी बहाद्दर आणि गुटख्याच्या पिचकाठयांमुळे विधानभवन इमारतीचे विद्रुपीकरण होते. जिन्यालगतच्या भिंती खराब होतात. त्यामुळे विधानसभा अधिवेशन पार पडल्यानंतर दर चार महिन्यांनी विधानभवन इमारतीच्या भिंतींना रंगरंगोटी करण्याची वेळ येते, असे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी चिंचवड येथे केले.
वादग्रस्त विधांनानी चर्चेत असणारे मंत्री गिरीश महाजन यांनी विधीमंडळातील आमदारांसंदर्भात एक वाद ओढवून घेतला आहे. चिंचवड येथे आयोजित 'स्वच्छ हरित ग्राम व जल समृद्ध गाव' या विषयावर आधारित राष्ट्रीय कार्यशाळेत बोलताना महाजन यांनी परदेशातील स्वच्छतेचे दाखले देताना ते थेट राज्याच्या विधीमंडळात पोहोचून टीका केली. तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सुरू आहे. या अधिवेशनात देशातील अधिकारी, सरपंचांना गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन केले.
महाजन म्हणाले, आपला देश प्रगतीपथावर आहे. मोदीच्या नेतृत्वाखाली आपण सुपरपॉवर बनत आहोत. आपण सुपरपॉवर बनूच. मात्र, आपला देशसुद्धा तेवढाच सुंदर आणि स्वच्छ बनला पाहिजे. आपण युरोप, अमेरिका, जपान, जर्मनीमध्ये पाहतो, तेथील लहान गावात गेलो तरी स्वच्छता आढळते. कोठेच अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य आढळत नाही. तेथे कोणी रस्त्यावर शौचास बसत नाही की रस्त्यावर अस्ताव्यस्त कचरा फेकण्याचे प्रकार होत नाहीत. मात्र, आपल्याकडे सर्रास असे प्रकार घडतात.
पुढे बोलताना महाजन म्हणाले, एवढेच नव्हे तर माणिकचंद्र, कमल-विमल, सुमन, गोवा पान पराग या कंपन्यांचा गुटखा खाऊन आपण किती लांब पिचकारी मारू शकतो, याची स्पर्धा लागलेली असते. कॉलेज, सार्वजनिक ठिकाणी हे आपल्याला पहायला मिळते. असे सांगताना महाजन यांनी स्वानुभव कथन केला. आपण महिन्याभरापूर्वी मोटारीतून जात होतो. एका बसला ओव्हरटेक करून जात असताना बसमधील एका प्रवाशाने खिडकीतून गुटख्याची लांबलचक पिचकारी मारली. त्यामुळे मोटारीची काच लालीलाल झाली. मोटार चालकाला अक्षरश: पुढचे काहीच दिसत नव्हते, असा अनुभव सांगितला