पुणे : मागील काही वर्षांपासून मणक्याच्या विकाराने पाठीला आलेला बाक शस्त्रक्रियेद्वारे सरळ करण्यात ससून रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. आता ही मुलगी इतर मुलांप्रमाणे ताठ मानेने चालत आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना व वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक विभाग यांच्या मदतीने माफक खर्चात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शिरूर तालुक्यातील रामलिंग गावातील शेतकरी कुटूंबातील ही मुलगी आहे. मागील काही वर्षांपासून मुलीच्या पाठीला बाक होता. तिला ‘कायफोस्कोलिओसिस’ हा विकाराने त्रस्त केले होते. तिच्या पालकांनी अनेक खाजगी डॉक्टरांना दाखविले. पण शस्त्रक्रियेचा खर्च खुप असल्यामुळे पालक उपचार टाळत होते. ससून रुग्णालयामध्ये तपासणी केल्यानंतर त्यांना आशेचा किरण सापडला. रुग्णालायतील मणकाविकार तज्ज्ञ डॉ. अंबरीश माथेशूळ यांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी एक्सरे, एम.आर.आय., सिटीस्कॅन या तपासण्या करण्यात आल्या. मुलीच्या पाठीच्या ठिकाणी दोन बाक असल्याचे यामध्ये आढळून आले. बाक सरळ करण्याची शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीपणे करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी २४ स्क्रू वापरण्यात आले व तिची पाठ सरळ करण्यात पूर्णपणे यश आले. शस्त्रक्रिये दरम्यान मज्जारज्जू व नसांना धक्का लागू नये व पायाची ताकद जाऊ नये यासाठी अत्याधुनिक नयूरोमॉनिटरिंग वापरण्यात आले. ही शस्त्रक्रिया तब्बल पाच तास चालली. त्यामुळे कमीतकमी रक्तस्त्राव व्हावा याची दक्षता घ्यावी लागली. शस्त्रक्रियेनंतर मुलीची पाठ सरळ झाली असून ती आता सर्वसामान्यांप्रमाणे आपले आयुष्य जगु शकणार आहे, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अंबरीश माथेशूळ, डॉ. सुशांत घुमरे, भूलतज्ज्ञ डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. योगेश गवळी व डॉ. रोहित संचेती यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली. ---------- वाकडी पाठ, कुबड व बाक (कायफोस्कोलिओसिस) हा आजार वयाच्या ५ ते १५ वर्षांच्या मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. या आजारामुळे पाठ वाकडी होते, उंची कमी होते व पायाला व कमरेला कमजोरी येते. वय १० ते १४ या दरम्यान उपचार घेतल्यानंतरच पाठ सरळ करता येते. ससूनमध्ये या आजाराचे उपचार उपलब्ध आहे.- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून रुग्णालय
पाठीला बाक असलेली मुलगी जगु लागली ताठ मानेने
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 12:47 PM
‘कायफोस्कोलिओसिस’ हा विकाराने त्रस्त केले शस्त्रक्रियेसाठी २४ स्क्रू वापरण्यात आले व तिची पाठ सरळ करण्यात पूर्णपणे यश आले.
ठळक मुद्देआरोग्य योजना व वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक विभाग यांच्या मदतीने माफक खर्चात शस्त्रक्रियाशस्त्रक्रियेसाठी वापरण्यात आले २४ स्क्रू