पिंपरी - एका उच्चशिक्षित तरुणीने चेहरा व डोळ्यावर स्कार्फ बांधून चार मजली इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. सामान्य कुटुंबातील या तरुणीच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. वाकड येथे सोमवारी (दि. २०) सकाळी सातच्या सुमारास ही धक्कादाक घटना घडली.
नम्रता गोकुळ वसईकर (वय २४, रा. नंदनवन कॅालनी, माऊली चौक, वाकड, मूळ रा. दराणे रोहले, ता. शिंदखेडा, जि. धुळे), असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत नम्रता ही सोमवारी (दि. २०) सकाळी पावणेसहाच्या सुमारास घरातून बाहेर निघाली. माऊली चौकातील एका चारमजली इमारतीच्या छतावर गेली. तेथे चेहरा आणि डोळ्यांवर स्कार्फ बांधून इमारतीच्या छतावरून तिने उडली मारली. यात तिच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. याबाबत एका व्यक्तीने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नम्रता हिच्या चेहऱ्यावरील स्कार्फ कापून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र ओळख पटली नाही. पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, नम्रता घरी न परतल्याने तिच्या कुटूंबियांनी शोध सुरू केला. सायंकाळी उशिरा ते वाकड पोलीस ठाण्यात गेले. मयत नम्रताचा फोटो पोलिसांना दाखविला. तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना सांगितले. शवविच्छेदन करून नम्रताचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.
कुटुंबाला बसला धक्कामयत नम्रता हिचे ‘बीटेक’ (आयटी) पर्यंत शिक्षण झाले. तिच्यापेक्षा लहान असलेल्या तिच्या भावाला नोकरी लागल्याने सहा महिन्यांपूर्वी त्यांचे कुटूंब धुळे जिल्ह्यातून वाकड येथे स्थायिक झाले. तिची आई गृहिणी असून वडील चर्मकार म्हणून चप्पल-बूट शिवण्याचे तसेच पाॅलीश करण्याचे काम करतात. सामान्य असलेल्या वसईकर कुटुंबाला या घटनेमुळे मोठा धक्का बसला.
कोर्ससाठी ३० हजारांची होती आवश्यकता -मृत नम्रता हिला साॅफ्टवेअरमधील काही ‘लॅंग्वेज’ शिकायच्या होत्या. त्या कोर्ससाठी ३० हजार रुपयांची आवश्यकता होती. मात्र चर्मकार असलेल्या वडिलांना चप्पल-बूट शिवून घरखर्चापुरता पैसे मिळतात. तसेच तिच्या लहान भावालादेखील तोकड्या पगाराची नोकरी आहे. यामुळे पैसे उपलब्ध होण्यात अडचणी येत होत्या. नम्रता उच्चशिक्षित होती. तसेच तिला नोकरीची संधी सहज उपलब्ध झाली असती. असे असतानाही तिने जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला.