पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात रिक्षा चालकाने एका युवतीचा विनयभंग केला. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, पसार रिक्षा चालकाचा शोध घेण्यात येत आहे.
याबाबत एका युवतीने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी रिक्षा चालकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तक्रारदार युवती कोथरूड परिसरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. युवती मूळ परराज्यातील आहे. काही कामानिमित्त ती रिक्षाने १६ मार्च रोजी विद्यापीठात आली होती. सायंकाळी चारच्या सुमारास पाऊस सुरू झाला, त्यावेळी ती रिक्षात बसलेली होती. विद्यापीठाच्या आवारात रिक्षात थांबलेली असताना, रिक्षा चालकाने युवतीशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या युवतीने रिक्षा चालकाला विरोध करत, रिक्षातून बाहेर पळ काढला.
दरम्यान, रिक्षा चालकाने युवतीला धमकावून तिचा मोबाइल नंबर घेतला. यानंतर, घाबरलेल्या युवतीने पोलिसांकडे तक्रार दिली. पसार रिक्षा चालकाचे नाव सचिन असल्याचे पोलिसांना समजले असून, सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड पुढील तपास करत आहेत.