पुणे : आपण जे भोगलंय, अनुभवलंय ते आपल्या मुलांनी अनुभवू नये. त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल असावा अशी खरं तर प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. प्रत्येकवेळी संसाराचा गाडा रेटताना त्यांना मुलांचे हवे तसे संगोपन करता येतेच असे नाही. पण काही दाम्पत्य मात्र त्याला अपवाद असतात. मुलांचे भविष्य घडवण्यासाठी दिवस रात्र एक करतात नव्हे त्यांचे यश हे आयुष्याचे ध्येय बनवतात. आणि शेवटी त्यांच्या या कष्टाला सलाम करावा असे कर्तृत्व त्यांची मुले दाखवतात सुद्धा ! याचाच प्रत्यय पुण्यात आला आहे. नुकत्याच महाराष्ट्र राज्य लोकसेवा परीक्षेच्या लागलेल्या निकालात पुण्यातील पूजा गायकवाड हिची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली. अवघ्या २२ वर्षांची पूजा आता उपजिल्हाधिकारी म्हणून काम करणार आहे. तिच्या कष्टाचे यात कौतुक आहेच पण तिची आई अरुणा गायकवाड यांचे विशेष कौतुक होत आहे.
इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या अरुणा यांनी शिक्षणाचे महत्व वेळीच ओळखले आणि मुलीच्या पंखात आत्मविश्वासाचे वारे भरले. तिने भरारी घेतली ती थेट उपजिल्हाधिकारी पदापर्यंत. गायकवाड दाम्पत्याला तीन मुली. मोठी मुलगी सोनल ही महसूल खात्यात नोकरी करते तर दोन नंबरच्या पूजाने राज्यशास्त्र विषयात पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी घेतली. तिसरी मुलगी सध्या शिक्षण घेत असून पूजाच्या यशाने हे कुटुंब सध्या उत्साहात न्हाऊन निघत आहे. पूजाचे वडील तानाजीहे रेल्वे कॅन्टीनच्या सेवेतून निवृत्त झालेले तर आई गृहिणी. घरची परिस्थिती खूप श्रीमंत नसली तरी तिच्या आई वडिलांनी इंग्रजीचे महत्व ओळखून तीनही मुलींना इंग्रजी शाळेत घातले. मुली काय अभ्यास करतात याकडे त्यांचे कायम लक्ष असायचे. विशेषतः तीनही मुली आहेत असा उल्लेखही त्यांनी कधीही केला नाही.
याबाबत अरुणा म्हणतात, 'तिला मी कधीही काही काम सांगितलं नाही. ती अभ्यास करायची आणि मी तिला बाहेरून शक्य तेवढी मदत करत होते. अवघ्या पाच हजार रुपयांची पुस्तकं घेऊन ती नायब तहसीलदार झाली. पण यावेळी अभ्यास करताना तिला वेळेत जेवण देणं, घरात अभ्यासाचं वातावरण ठेवणं आम्ही केलं.आम्ही मुलींच्या लग्नासाठी पैसे नाही जमवू शकलो पण मुलींचे शिक्षण व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केल्याचा त्या आवर्जून सांगतात.
पूजा सांगते, 'एकवेळ बाहेरचे लोक म्हणायचे पण माझ्या आई वडिलांनी मुलगा-मुलगी भेद तर लांबचं पण आम्ही 'मुली' असल्याचा उल्लेखही केला नाही. त्यांनी आमच्या म्हणण्याला, निवडीला कायम महत्व दिले. आम्हाला स्वातंत्र्य दिले. मी पहिल्या प्रयत्नात नायब तहलसीलदार झाल्यावरही मला उपजिल्हाधिकारी होण्याची आस होती. त्यांनी आणि माझ्या ताईने त्याला भक्कम पाठिंबा दिला. आज जे काही यश मिळवले यात त्यांचा वाटा सर्वाधिक आहे. आई वडिलांनी दिलेले स्वतंत्र्य मला निर्णय घेताना कायम उपयोगी पडणार आहे. त्यांच्या संस्कारांच्या शिदोरीवर एक उत्तम, संवेदनशील प्रशासकीय अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न येत्या दिवसात प्रत्यक्षात अवतरणार आहे.