पुणे : पालकांनी लग्नाला नकार दिल्याने मुलीने आत्महत्या केली़ त्यामुळे प्रियकर व त्याच्या आई-वडिलांवर दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यासाठी मुलीच्या पालकांनी ५ लाखांची मागणी केली. या त्रासाला कंटाळून प्रियकरानेही ७ डिसेंबर रोजी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना हवेली तालुक्यातील बहुली गावात घडली.
याप्रकरणी उत्तरनगर पोलिसांनी दिलीप पंढरीनाथ कांबळे (५८) यांच्या फिर्यादीवरून नत्थू लक्ष्मण भगत, पुष्पा नत्थू भगत, अविनाश नत्थू भगत, हरिभाऊ लक्ष्मण भगत, दिनकर लक्ष्मण भगत, मारुती लक्ष्मण भगत (रा़ बहुली, ता़ हवेली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दिलीप यांचा मुलगा अनंता आणि नत्थू यांची मुलगी अमृता यांचे प्रेम होते़ त्यावेळी अमृताचे वय २१ व अनंताचे वय १८ वर्षे होते़ भगत यांनी लग्नाला नकार दिल्यामुळे २०१३मध्ये अमृताने आत्महत्या केली. यात दिलीप, अनंता व इतरांवर पौड पोलिसात गुन्हा दाखल झाला. तो मागे घेण्यासाठी भगत यांनी ५ लाख मागितल्याचा आरोप कांबळेंचा केला़ दरम्यान, प्रियकर अनंता कांबळे यांने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडली आहे.