पुणे : सीओईपी तंत्र विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीने तिच्या खाेलीत राहणाऱ्या सहकारी मैत्रिणींचे चाेरून आक्षेपार्ह फाेटाे काढले आणि ते प्रसारित केल्याचा आराेप केला आहे. या प्रकरणी विद्यार्थिनींनी तक्रार करताच विद्यापीठ प्रशासनाने संबंधित विद्यार्थिनीविराेधात पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कुलसचिव डाॅ. डी. एन. साेनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन या घटनेच्या चाैकशीसाठी विद्यापीठांतर्गत उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. संबंधित विद्यार्थिनीविराेधात कठोर कारवाई करीत विद्यापीठाने पोलिसांत तक्रार दिली आहे.
विद्यापीठाने संबंधित विद्यार्थिनीला वसतिगृह कॅम्पसमधून काढून टाकले आहे. यासह चौकशी प्रलंबित असल्याने विद्यापीठातून विद्यार्थिनीला तात्पुरते निलंबित केले आहे. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ विद्यार्थ्यांचा सन्मान ठेवणे आणि त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचेही विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.