पुणे : प्रेयसीने प्रेमाखातर प्रियकराला विविध ठिकाणांहून कर्ज काढून दिले. मात्र या कर्जाचे हप्ते प्रियकराने न भरता प्रेयसीलाच मानसिक त्रास दिला. या त्रासातून प्रेयसिने घरातील बेडरूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकणी प्रेयसीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून मुलीच्या प्रियकराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रसिका उर्फ राणी रवींद्र दिवटे (२५, रा. घोरपडी) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. तर आदर्श अजयकुमार मेनन (२५, रा. झेड कॉर्नर, मांजरी) असे अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी रसिकाची आई चंदा रवींद्र दिवटे (४८) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात आदर्श विरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रसिका आणि आरोपी आदर्श यांच्यात प्रेम संबंध होते. जानेवारी २०२३ पासून त्याचे प्रेम प्रकरण सुरू झाले. त्यानंतर आदर्शने रसिकाकडून वेळोवेळी क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन व अन्य ५-६ लोन ॲप वरून पावणे चार लाखांचे कर्ज घेतले. तसेच या कर्जाचे हप्ते मी भरेन असे आश्वासन देखील आदर्शने रसिकाला दिले होते. मात्र, कर्जाच्या हप्त्यांची परतफेड आदर्श करत नसल्याने त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती.
आदर्श रसिकाला या कारणास्तव मानसिक त्रास देत असल्याने, तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आदर्शला पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अशोक गांधले करत आहेत.