खोडद : रविवारी पहाटे ४ वाजता किल्ले शिवनेरीवरून खोडद गावातील मुलींनी शिवज्योत प्रज्वलित करून आणली. तसेच खोडद गावातून त्या शिवज्योतीची मिरवणूक काढण्यात आली. तसेच सायंकाळी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढली. येथे खोडद क्रीडा मंडळ व ग्रामस्थ यांनी संयुक्तपणे आयोजिलेल्या बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम साजरे केले.या वेळी आयोजिलेल्या कार्यक्रमात सुमारे १२ विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर ‘गड आला पण सिंह गेला’ ही नाटिका सादर केली. साहिल हांडे, सोमेश डोके व वैष्णव मुळे यांनी पोवाडे सादर केले. सना तांबोळी, सुदर्शन थोरात, मयुरी नायकरे, वैष्णव मुळे, संजना घायतडके, वैष्णव काळे, सानिका घंगाळे, साक्षी कुचिक, पायल भोर, माजी सैनिक चंद्रकांत पोखरकर यांची शिवचरित्रावर भाषणे झाली.या वेळी गड, किल्लेसंवर्धनकार्यात सक्रिय असणारे विनायक खोत, सुभाष कुचिक, राजकुमार डोंगरे, प्रा. राधाकृष्ण गायकवाड, शिवदास खोकराळे, विजय कोल्हे, माजी सैनिक रमेश खरमाळे, हनुमंत जाधव, शाकीर पठाण, अशोक खरात यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी सरपंच विजय गायकवाड, उपसरपंच ज्योती मुळे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खोडद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष तुषार आंधळे, सचिव सलीम तांबोळी, ज्ञानेश्वर सातपुते, गोविंद भोर, प्रवीण कानडे, संतोष खरमाळे, ज्ञानेश्वर बोऱ्हाडे, आशुतोष भोर, नानाभाऊ खरमाळे आदींनी परिश्रम घेतले. तुषार आंधळे यांनी प्रास्ताविक केले. क्रीडाशिक्षक किरण वाघ यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. राधाकृष्ण गायकवाड यांनी आभार मानले. तरूणांनी पुढाकार घ्यावा ‘केवळ जय भवानी, जय शिवाजी’ म्हणून शिवजयंती साजरी होणार नाही, तर त्यासाठी शिवरायांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. आपल्या परिसरातील गडकोट किल्ले हे आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत, म्हणून आपण या गडकोट किल्ल्यांचे संवर्धन करून आपली शिवसंस्कृती जतन करण्यासाठी आपल्या तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा.’’ असे विनायक खोत म्हणाले.
मुलींनी आणली शिवनेरीवरून शिवज्योत
By admin | Published: February 21, 2017 2:10 AM