लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बारावीच्या निकालात राज्याप्रमाणेच पुणे शहरातही मुलींचेच वर्चस्व राहिले आहे. शहरांतील अनेक महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत पहिल्या दहा क्रमांकामध्ये मुलींनी स्थान मिळविले आहे. शहराच्या पूर्व भागात ९३.०३ टक्के, तर पश्चिम भागात ९२.७४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.राज्य शिक्षण मंडळाने पुणे शहरातील महाविद्यालयांचे पूर्व व पश्चिम असे दोन भाग केले आहेत. पूर्व भागातून २२ हजार ५२७ तर पश्चिम भागातून २५ हजार १४५ अशा एकूण ४७ हजार ६७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामध्ये २४ हजार ६२२ मुले तर २३ हजार ५० मुलींचा समावेश होता. त्यापैकी पूर्व विभागातून ९३.०३ टक्के मुली व ८४.६७ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. तर पश्चिम विभागातून ९२.७४ टक्के मुली आणि ८७.४२ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. दोन्ही भागांतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची आकडेवारी पाहता यंदाही मुलींनीच सरशी साधल्याचे दिसते. पूर्व भागाचा एकूण निकाल ८८.६१ टक्के, तर पश्चिम भागाचा ९०.०५ टक्के लागला आहे. शहरातील फर्ग्युसन, स. प., बीएमसीसी अशा अनेक महाविद्यालयांमध्ये पहिल्या दहा क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक मुलींचा समावेश आहे. आॅनलाइन निकाल जाहीर होणार असल्याने शहरातील बहुतेक महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. बहुतेक विद्यार्थ्यांनी घरबसल्या मोबाईलवरच निकाल पाहिला. त्यामुळे सायबर कॅफेमध्येही गर्दी दिसून आली नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाच्या आनंद घरी कुटुंबीयांसोबत तसेच मित्रांसोबत साजरा केला. काही महाविद्यालयांनी पहिले तीन क्रमांक तसेच विविध विषयांत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना बोलावून अभिनंदन केले.
शहरात मुलींचे वर्चस्व
By admin | Published: May 31, 2017 3:06 AM