Ajit Pawar: मुलींना छेडछाड, 'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह'; बारामतीत अजितदादा ‘ॲक्शन मोड’ मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 01:07 PM2024-10-03T13:07:01+5:302024-10-03T13:07:25+5:30
मुली ,बालके यांना भयमुक्त वातावरण निर्माण करणे, त्यांना विश्वासात घेऊन समस्यांचे निराकरण, कायदे विषयक मार्गदर्शन; बारामतीत पंचशक्ती अभियान
बारामती: बारामती शहरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या खळबळजनक घटनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ‘ॲक्शन मोड’ मध्ये आले आहेत. पवार यांनी गुरुवारी(दि ३) पहाटे सहा वाजता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेत महत्वपूर्ण निर्णय घेतले. महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थीनी, महिलांच्या प्रभावी सुरक्षिततेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत पंचशक्ती अभियान सुरु केले आहे.
यामध्ये शक्ती बाॅक्स, शक्ती कक्ष, शक्ती नंबर, शक्ती नजर, शक्ती भेट या उपक्रमांचा समावेश आहे.शाळा महाविद्यालय,शासकीय कार्यालयांसह सर्वत्र सार्वजनिक ठीकाणी हे उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.
पवार यांनी याबाबत पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली. पवार म्हणाले, शहरात पंचशक्ती अभियान सुरु करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यात महिलांचा सन्मान, पालकांची सुरक्षा आणि युवकांचे प्रबोधन या अभियान केलं जाणार आहे. या अभियानात पंचशक्ती आहे. शक्ती बाॅक्स ही एक तक्रारपेटी शाळा महाविद्यालय, शासकीय कार्यालयांसह अनेक महिला तथा मुलींना अडचणींबाबत म्हणजे मुलांकडून होणारा पाठलाग, छेडछाड, निनावी काॅल सारखे काही प्रकार चालतात, याबाबत पीडित महिला किंवा मुलींना मनमोकळेपणाने त्यांना ही गोष्ट सांगता येत नाही. अशा पीडितांना आपलं म्हणणं किंवा आपली तक्रार या पेटीद्वारे मांडता येणार आहे. गुन्हेगारीच्या अनुषंगाने काही संशयास्पद वस्तू आढळल्यास, तसेच अवैध गांजा, गुटखा इत्यादींचा साठा सापडल्यास याबाबतची गोपनीय माहिती तक्रारपेटीत टाकल्यानंतर पोलिसांमार्फत सदरची पेटी उघडून त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधितांचं नाव देखील अतिशय गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले.
त्याचबरोबर एक शक्तीनंबर देखील तयार केला आहे. ''एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह'' असं स्लोगन त्याला दिलंय. तो नंबर '९२०९३९४९१७' या क्रमांकाची सेवा सातही दिवस २४ तास सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या नंबरवर फोन किंवा मेसेज करुन तक्रार केल्यास त्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत योग्य ती दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,प्रत्येक पोलीस स्टेशनला शक्ती कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये दोन महिला पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुली ,बालके यांना भयमुक्त वातावरण निर्माण करणे, त्यांना विश्वासात घेऊन समस्यांचे निराकरण करणे, कायदे विषयक मार्गदर्शन करण्यात येइल. याशिवाय शक्ती नजर उपक्रमाअंतर्गत सोशल मिडीयावर पोलीसांची नजर राहणार आहे. यामध्ये शस्त्र, बंदुक, धारदार हत्यारांचे फोटो ठेवणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात येइल. तसेच शक्ती भेट अंतर्गत शाळा महाविद्यालयांना भेटी देण्यात येत आहेत. शाळा, कॉलेज, सर्व सरकारी कार्यालय, कंपन्या हॉस्पिटल, बस स्टँड ,कोचिंग क्लास, महिला वसतीगृह आदी सार्वजनिक ठिकाणी भेटी देऊन कायदेशीर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय व्यसनाधीनता, बाल गुन्हेगारी बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याची सुसंवाद साधून लैंगिक, शारीरिक मानसिक छळापासून संरक्षण करून याबाबत जागरूकता निर्माण करणे, या भेटीचा उद्देश असल्याचे पवार म्हणाले.