पुणे : काळ बदलला... ‘ती’ घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडली... अनेक क्षेत्रे पादाक्रांत करीत ‘ती’ने आपल्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा उमटवायला सुुरुवात केली... कर्तृत्वाची क्षितिजे विस्तारत ‘ती’ची ओळख बदलू लागली... बदलली नाही ती समाजाची ‘ती’च्याकडे पाहण्याची मानसिकता! ही मानसिकता बदलायला अनेक वर्षे लागतील. आपल्यालाच यातून मार्ग काढायचा असेल तर ‘मुलींनो, बोलत्या व्हा, एकमेकींना मदतीचा हात द्या’ हा संदेश ‘फ्लिकरिंग फ्लेम’ लघुपटातून देण्यात आला आहे. लेखिका कविता शिरोडकर यांच्या कथेवर आधारित असलेल्या या लघुपटाचे दिग्दर्शन गायिका धनश्री गणात्रा यांनी केले आहे. स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन या वाईट प्रवृत्तींच्या विरोधात आवाज उठवावा, यासाठी हॅशटॅगच्या माध्यमातून चळवळ उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
शिरोडकर म्हणाल्या, ‘लघुपटामध्ये समाजातील अंधकार, मानसिकता चित्रीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कथा २४ वर्षांच्या नोकरदार मुलीवर बेतलेली आहे. नोकरीच्यानिमित्ताने ती बाहेरगावी जाते. त्या ठिकाणी तरुणीला दोन-तीन दिवसांमध्ये रस्त्यातून जाता-येता, तसेच आॅफिसमध्ये छेडछाड, असभ्य वर्तन असे वाईट अनुभव येतात. या घटनांमुळे तिला खूप नैराश्य येते. बहुतांश मुलींना रोजच्या जीवनात अशा वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते आणि त्यातून नैराश्य येते. तरुणी याबाबत खुलेपणाने बोलायला धजावत नाहीत. समाजाची मानसिकता बदलणे शक्य नसले तरी त्यातून मार्ग काढण्यासाठी तरुणींनीच पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी त्यांनी बोलते होणे, आपल्या भावनांना वाट करून देणे आणि एकमेकींना मदतीचा हात देणे आवश्यक आहे, हाच संदेश लघुपटातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.’
लघुपटात नोकरदार तरूणींचे भावविश्व
- मुंबईच्या लेखिका कविता शिरोडकर यांच्या ‘फ्लिकरिंग फ्लेम’ या कथेवर आधारित लघुपटामध्ये नोकरदार तरुणींचे भावविश्व, वाईट नजरांचा करावा लागणारा सामना, त्यातून येणारे नैराश्य, अन्याय, अत्याचाराविरोधात आवाज गरज आदी बाबींचे बारकाईने चित्रण करण्यात आले आहे.
- लघुपटाचा कालावधी १९ मिनिटांचा असून, पटकथा, दिग्दर्शन, संगीत आदी जबाबदाऱ्या धनश्री गणात्रा यांनी पेलल्या आहेत. स्नेहा ताम्हणकर यांनी सहनिर्मितीची धुरा सांभाळली आहे.