पुणे : एकाच रस्त्यांवर वारंवार निधी टाकणे, केवळ नाव बदलून काम न करतादेखील निधी लाटणे, ड्रेनेज सफाई नक्की किती, कोठून किती केली, कच-याच्या गाड्या किती आल्या, किती कचरा उचलला आदी सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती आता कार्यालयात बसून अधिका-यांना सहज उपलब्ध होणार आहे.माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने सर्व कामांसाठी आता ‘भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) मॅपिंग सिस्टीम’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीची उधळपट्टी थांबण्यास मदत होणार आहे.महापालिकेच्या विविध विकासकामांसाठी जीआयएस प्रणाली लागू केल्यास सर्व विभागांची कार्यक्षमता वाढण्यास व कोट्यवधी रुपयांची बचत होण्यास मदत होणार आहे. महापालिकेच्या कामकाजात कार्यक्षमता, पारदर्शकता व दर्जा सुधारण्यासाठी जीआयएस प्रणालीचा चांगला उपयोग होणार आहे. सध्या पुणे महापालिकेच्या मालमत्ताकर विभाग, गार्डन विभाग, घनकचरा विभागामध्ये जीआयएस प्रणाली लागू केली आहे. आता लवकरच रस्ते, बांधकाम विभागामध्ये देखील ही प्रणाली लागू करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले. यामुळे शहरामध्ये एखाद्या प्रभागामध्ये एकाच रस्त्यावर किती वेळा निधी टाकला, रस्त्यांचे काम कधी झाले, कामाचा दर्जा कसा आहे याची सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.शहरातील एकूण किती किलोमीटर ड्रेनेजची सफाई करण्यात आली, किती गाळ काढण्यात आला आदी सर्व गोष्टींची माहिती उपलब्ध होणार आहे.प्रभागातील कामांची होणार माहिती उपलब्ध- या प्रणालीमुळे कोणत्या प्रभागात किती काम झाले, काय काम झाले व कधी झाले याची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याने कोणताही निर्णय घेताना उपयोग होणार आहे. तसेच महापालिकेकडे सर्व माहिती उपलब्ध असल्याने एखादे काम चांगले होते किंवा नाही, खरंच प्रत्यक्ष जागेवर काम केलं का, किती काम केलं आदी सर्व गोष्टी ट्रॅक करणे शक्य होणार आहे.
पालिकेच्या सर्व कामांचे ‘जीआयएस’ मॅपिंग; रस्ते, ड्रेनेजच्या कामांवर अधिक लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 4:22 AM