पुणे : कोरोना प्रतिबंधक लसींच्या पुरवठ्यातील एकूण सगळा गोंधळ पाहता पुणेकरांसाठी लसींची थेट खरेदी करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. यासाठी अदर पुनावालांची भेट घेत त्यांच्याकडे १० लाख लसींचा पुरवठा करण्याची विनंती करणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
पुणे महापालिकेकडुन जवळपास १०० हून अधिक केंद्रावर लसीकरण सुरु आहे. मात्र, महापालिकेला राज्य सरकारकडून येणाऱ्या लसी पुरेशा नसल्याने वारंवार लसीकरणात अडथळे येत आहेत. अनेक ठिकाणी केंद्र बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर येत आहे. त्यामुळे आता पुणे महापालिका थेट लस खरेदी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. साधारण १० लाख लसी मिळाव्यात, अशी विनंती महापौर मुरलीधर मोहोळ करणार आहेत.
याविषयी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले “आम्ही लसींची थेट खरेदी करायला तयार आहोत. त्यासाठी निधीची तरतूद करण्याचीही महापालिकेची तयारी आहे. त्याच्या चर्चेसाठी सिरम इन्स्टीट्यूटच्या आदर पुनावाला यांची भेट मागितली आहे. त्यांची वेळ मिळाली की याविषयी त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल”