3 जागा द्या अन्यथा 15 ठिकाणी उमेदवार उभे करु, राजू शेट्टींनी दिला आघाडीला अल्टीमेटम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 03:51 PM2019-03-12T15:51:20+5:302019-03-12T16:51:16+5:30
आघाडीकडून अद्याप कोणताही प्रकारच्या जागा वाटपाची तयारी नाही, आघाडीने आम्हाला 3 जागा सोडाव्यात अन्यथा राज्यात 15 ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे निवडणुका लढण्यास सज्ज आहे
पुणे - आघाडीकडून अद्याप कोणताही प्रकारच्या जागा वाटपाची तयारी नाही, आघाडीने आम्हाला 3 जागा सोडाव्यात अन्यथा राज्यात 15 ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे निवडणुका लढण्यास सज्ज आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला दिला.
पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी 3 जागा सोडाव्यात, यामध्ये बुलडाणा येथील राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागा तर वर्धा येथील काँग्रेस कोट्यातील जागा सोडण्यात यावी. तर हातकंणगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आही. जी जागा आमचीच आहे ती देण्याचा प्रश्नच नाही असं शेट्टी यांनी सांगितले.
हातकंणगले मतदारसंघातून सदाभाऊ खोत यांनी शेट्टीविरोधात निवडणूक लढण्याची तयारी केली आहे त्यावर बोलताना शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या बाजूने लढताना अनेक वेळा मी आंदोलने केली, शेतकरी न्याय हक्कांसाठी आवाज उठवतो म्हणून मोदी, फडणवीस यांच्यासह अनेक सत्ताधारी माझ्यावर नाराज आहेत मात्र लढाई मी लढणार आहे त्यामुळे माझ्यासमोर कोणीही निवडणूक लढवली तरी हरकत नाही, मी हातकंणगले मतदारसंघातून पुन्हा निवडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेस-राष्ट्रवादीकडून अनेक प्रस्ताव आले मात्र वर्धा, बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी आम्ही आग्रही आहोत. वर्धा मतदारसंघातून माजी मंत्री सुबोध मोहिते तर बुलडाणा मतदारसंघातून रविकांत तुपकर हे निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला आम्ही उद्यापर्यंत अल्टीमेटम देतो, आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करावा अन्यथा राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 15 जागांवर उमेदवार उभे केले जातील असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता आज बाळासाहेब विखे नाहीत.आहेत ते कार्यकर्ते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोडलेले आहेत.त्यामूळे थोडे फार कार्यकर्ते सोडले तर जास्त फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली.
याआधीच वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडीत सहभागी होणार नाही असं सांगत महाराष्ट्रातील 48 जागांवर वंचित आघाडीचे उमेदवार उभे करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेबाबत कोणता निर्णय घेते हे आगामी काळात कळेल.
पाहा व्हिडीओ -