पुणे : वंदे भारत रेल्वेच्या कोच प्रमाणेच आता लवकरच मुंबईच्या लोकलला कोच बसवण्यात येणार आहेत. असेच ५० कोच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने पुणे आणि सोलापूर विभागात धावणाऱ्या लोकल रेल्वे गाड्यांसाठी द्यावेत, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा म्हणाल्या, ‘११ मार्च १९७८ रोजी पुणे-लोणावळा लोकल सेवा सुरू झाली. गेल्या ४४ वर्षांत पुणे लोकलचा हवा तसा विकास झालेला नाही. पुणे-लोणावळा उपनगरीय वाहतूक आहे. त्याप्रमाणेच आता पुणे-दौंड-नगर, सोलापूर-कराड, पुणे-लोणंदला उपनगरीयचा दर्जा घोषित करणे गरजेचे आहे.
लोणावळा-पुणे- दौंड-नगर, लोणावळा-पुणे- सातारा लोकल सेवा सुरू करणे सध्या गरजेचे आहे. प्रत्येक पाच-पाच मिनिटाला मुंबईप्रमाणे विकास करायचा असेल, तर या मार्गावर लोकल सुरू व्हायला हव्यात आणि त्या सुरू करताना रेल्वेने या लोकलच्या जागी वंदे मेट्रो लोकलचे कोच द्यावेत. त्यात पुणे आणि सोलापूर विभागाला वंदे मेट्रोचे ५० रॅक द्यावेत, तरच पुणे आणि सोलापूर विभागातील लोकलचा विकास होईल. पुणे-मुंबई लोकल सेवा सुरू होणार होती, ती तातडीने सुरू करावी आणि तिला वंदे मेट्रो लोकलचा कोच द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.